समृद्धी महामार्गःजालना ते छत्रपती संभाजीनगर उच्चदाब वाहिनीचे काम;  पर्यायी वाहतुकीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिले वेळापत्रक

छत्रपती संभाजीनगर- हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रान्समीमिशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजूंची वाहतुक मंगळवार दि.३१ ऑक्टोबर, बुधवार दि.१ नोव्हेंबर व गुरुवार दि.२ नोव्हेंबर असे तिनही  दिवस दुपारी १२ ते साडे तीन यावेळात बंद असेल. उर्वरित कालावधीत वाहतुक सुरळीत सुरु राहील. बंद कालावधीत पर्यायी मार्गावरुन वाहतुक वळविण्यात आली आहे,असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता व प्रकल्प संचालक रामदास खलसे यांनी कळविले आहे.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रान्समीशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. हे काम मंगळवार दि.३१ ऑक्टोबर, बुधवार दि.१ नोव्हेंबर, गुरुवार दि.२ नोव्हेंबर असे तीन दिवस दुपारी १२ ते साडेतीन यावेळात होणार आहे.    हे तीनही दिवस काम सुरु असलेल्या कालावधीत (दुपारी १२ ते साडेतीन)  जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान समृद्धी महामार्गावरील जालना इंटरचेंज (IC-14) ते सावंगी इंटरचेंज (IC-16) दरम्यान नागपूरकडून मुंबईकडे जाणारी वाहतुक निधोना (जालना) इंटरचेंज IC-14 मधून बाहेर पडून निधोना एमआयडीसी मार्गे- राष्ट्रीय महामार्ग 753 A (जालना-छत्रपती संभाजीनगर) मार्गे केंब्रीज शाळेपर्यंत नंतर ती उजवीकडे वळून सावंगी बायपास मार्गे सावंगी इंटरचेंज क्र. IC-16 (छत्रपती संभाजीनगर) येथे समृद्धी महामार्गावर प्रवेश करुन शिर्डीकडे रवाना होईल. तर समृद्धी महामार्गावरील शिर्डीकडून नागपूरकडे जाणारी वाहतूक, सावंगी इंटरचेंज क्र. IC-16 (छत्रपती संभाजीनगर) येथून बाहेर पडून वर नमूद केलेल्या मार्गावरुन (विरुद्ध दिशेने) निधोना (जालना) इंटरचेंज क्र. IC-14 या ठिकाणी समृद्धी महामार्गावर प्रवेश करुन नागपूरकडे रवाना होईल,असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता व प्रकल्प संचालक रामदास खलसे यांनी कळविले आहे. उर्वरीत कालावधीत वाहतुक सुरळीत सुरु राहिल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.