छत्रपती संभाजीनगर जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी कठोर उपाययोजना करा-जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय

छत्रपती संभाजीनगर,४ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- जिल्ह्यात बालविवाहांच्या घटना घडू नये यासाठी प्रबोधन, जनजागृती करत असतांना कठोर उपाययोजना कराव्या. त्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा प्रकरणातील जबाबदार व्यक्ती व दोषींवर कडक कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी आज येथे दिले.

‘सक्षम’ हा बालविवाह निर्मूलन प्रकल्प जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्यासाठी ‘युनिसेफ’ या संस्थेतर्फे लोकजागर आणि लोकशिक्षण केले जात आहेत. जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी आज सर्व संबंधित विभागांची बैठक आयोजित करण्यात आली.

जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विकास मीना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, जागतिक आरोग्य संघटनेचे सर्व्हेक्षण वैद्यकीय अधिकारी डॉ. मुजीब सैय्यद, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. मंडलेचा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश चौगुले, सपोनि आरती जाधव, महिला बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव, युनिसेफचे व्यवस्थापकीय संचालक निसित कुमार, समन्वयक सोनिया हंगे, नंदू जाधव, सहा. प्रकल्प समन्वयक बाळकृष्ण  साळुंखे, शुभम साबळे आदींसह अन्य विभागप्रमुख उपस्थित होते.

जिल्ह्यात ‘सक्षम’ हा बालविवाह निर्मूलन प्रकल्प राबविण्यात येत आहे. यासंदर्भात राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षणातून आलेल्या माहितीनुसार, बालविवाह रोखणे हे मुलींच्या आरोग्य, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास तसेच भावी पिढीचे आरोग्य  यासाठी आवश्यक आहे. जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी शाळा सोडून गेलेल्या मुलींचे सर्व्हेक्षण करावे. त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न व्हावे. तसेच प्रत्येक गरोदर महिलेची नोंद घेणे आवश्यक आहे,असे यावेळी सांगण्यात आले. महिलांमध्ये होणारे रक्तक्षय, त्यांच्या आरोग्यावर होणारे परिणाम याबाबत जनजागृती होणे आवश्यक असून त्यासाठी शालेय पातळीवर प्रयत्न होणे आवश्यक आहे. मुला मुलींमध्ये लिंगसमानतेची भावना रुजवावी यासाठी राबवावयाच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.

जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले की, शिक्षण विभाग, पंचायत विभाग, आरोग्य विभाग, गाव पातळीवरील पोलीस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यासारखे कर्मचारी यांची बालविवाह रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यासाठी ग्राम बाल संरक्षण समिती, शाळा व्यवस्थापन समिती यासारख्या समित्यांमधील सदस्य ही महत्त्वाचे योगदान देऊ शकतात. बालविवाहाच्या घटना घडल्यास त्यास जबाबदार व्यक्तिंवर कारवाई होणे आवश्यक आहे. विकासकामांसाठी निधी देतांना त्या गावात बालविवाह झाले नाही हा निकष महत्त्वाचा करण्यात येईल. नागरिकांनी आपल्या सभोवताली कुठे बालविवाह होत असल्यास त्याची माहिती 1098  व 112 या टोल फ्रि क्रमांकावर द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.