मेडिकल व्यावसायिकाला दोन कोटी ६५ लाखांना गंडा घालणारा जेलमध्ये

औरंगाबाद,११ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-
मांतगी इंटरप्रायजेसच्या नावाखाली एका मेडिकल व्यावसायिकाला दोन कोटी ६५ लाखांना गंडा घालणारा कमलाकर राजारामपंत कुलकर्णी (६२, रा. गल्ली क्रं.४, मंत्रीनगर, सुतमील रोड जि. लातूर) याची न्‍यायालयीन कोठडीत रवानगी करण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी ए.ए. मोताळे यांनी गुरुवार दि.११ ऑगस्‍ट रोजी दिले. या प्रकरणात आरोपीला ३ ऑगस्‍ट रोजी पोलिसांनी लातुर येथुन अटक केली होती. गुन्‍ह्यात आरोपीने सात वर्षांपूर्वी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्‍यायालयाने फेटाळला होता, तेंव्‍हा पासून पसार होता.

एन-८ सिडको येथील विनायक सोसायटीत राहणारे अभिजीत अरुणराव कुलकर्णी (४२) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, अभिजीत हे मेडिकल व्यावसायिक असुन त्यांची ओळख परभणीत राहणार्‍या कमलाकर कुलकर्णी व बाळसाहेब दैठणकर यांच्या सोबत झाली होती. बाळासाहेब दैठणकर याने अभिजीत यांची ओळख पुण्यातील विश्‍वनाथ अवचट याच्या सोबत करुन दिली होती. दरम्यान जुलै २०१३ मध्ये दैठणकर, अवचट आणि कमलाकर कुलकर्णी या तिघांनी  अभिजीत यांना मांतगी इंटरप्रायजेस संस्थे बद्दल माहिती दिली. ही संस्था सामाजिक कार्य करणारी असुन आरबीआय कडुन संस्थेला एनआरआय फंड मिळणार आहे असे सांगत भांमट्यांनी अभिजीत यांना हा फंड काढण्यासाठी जितके पैसे द्याल  त्याच्या दहा पट रक्कम तुम्हाला सात महिन्यात परत मिळेल असे अमिष दाखविले. या सर्व बाबी खर्‍या वाटव्या म्हणुन या भामट्यांनी अभिजीत यांची ओळख पुण्यातील निवेदीता कुलकर्णी व अशोक जंगम नावाच्या व्यक्‍तीशी करुन दिली. अभिजीत कुलकर्णी त्यांच्या आमिषाला बळी पडले व त्यांनी वेळोवेळी असे दोन कोटी ६५ लाख रुपये भांमट्यांना दिले. दरम्यान सात महिने उलटुनही पैसे देत नसल्याचे पाहुन अभिजीत यांनी पैशासाठी कमलाकर कडे तगादा लावला होता. मात्र आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी मुकूंदवाडी पोलिस ठाणे गाठत कमलाकर कुलकर्णीसह इतर आरोपीं विरुध्द तक्रार दिली.या तक्रारी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपी कमलाकर कुलकर्णी याच्‍या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्‍याला न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, न्‍यायालयाने त्‍याची न्‍यायालयीन कोठडीत रवानगी केली. आरोपीने तात्काळ जामीनीसाठी अर्ज सादर केला. अर्जावरील सुनावणी सुरु असून सहायक सरकारी वकील ए.व्‍ही. घुगे यांनी आरोपीने ऑगस्‍ट २०१३ ते डिसेंबर २०१४ दरम्यान फिर्यादीकडून घेतलेल्या रक्कमेचा विनियोग कोठे केला. आरोपीचे आणखी कोणी सा‍थीदार आहेत काय, आरोपीने फिर्यादी आणि साक्षीदारांची कशा प्रकारे फसवणुक केली याचा तपास बाकी असल्याचा युक्तीवाद आज न्‍यायालयात केला. दोन्‍ही बाजुच्‍या युक्तीवादानंतर न्‍यायालयाने प्रकरण आदेशासाठी राखुन ठेवले आहे. या प्रकरणात घुगे यांना महिला पोलिस शिपाई एस.एस. वाकोडे यांनी मदत केली.