वैजापूर येथे महिला बचत गटातर्फे पाच ठिकाणी तिरंगा ध्वज वितरण

वैजापूर,११ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- नगर परिषदेच्यावतीने  दिनदयाळ अंत्योदय योजना नागरी उपजीविका अभियानअंतर्गत हुतात्मा स्मारक येथे शहरातील महिला बचत गटातील सदस्यांचा मेळावा गुरुवारी(ता.11) पार पडला. पालिकेचे उप मुख्याधिकारी राहुल साठे यांच्या उपस्थितीत सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी धोंडिरामसिंह राजपूत यांनी घरावर 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान ध्वज फडकविण्याची पद्धत समजावून सांगून देशाभिमान व राष्ट्राभिमान राखण्याचे आवाहन केले तसेच प्रत्यक्ष कृतीतून ध्वज संहिता समजावून सांगितली. 

शहरातील ओम साई महिला बचत गट, श्री. स्वामी समर्थ महिला बचत गट, नगर परिषदेत स्टॉल, स्वच्छता निरीक्षक कार्यालयजवळ स्टॉल व अस्मिता महिला बचत गट स्टॉल अशा पांच ठिकाणी नागरिकांना काही मूल्ये देऊन घरावर फडकविण्यासाठी ध्वज मिळेल असे पालिकेचे सुनील भाग्यवंत व दिवाकर त्रिभुवन यांनी सांगितले. या महिला मेळाव्यात राजपूत यांनी ध्वज फडकविताना घ्यावयाची काळजी बाबत मार्गदर्शन केले, महिला बचत गट मार्गदर्शक सुर्यकांता काकडे, ललिता देशमुख, रोहिणी नाईकवाडी, मीरा साळुंके, मंगल बोडखे, संगीता लाडवानी, प्रमिला सख, सुलोचना संख, स्वाती मोहन यांनी सहभाग नोंदविला.