जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आरोग्य अभियानांच्या तयारीचा आढावा

मिशन इंद्रधनुष्य, एकात्मिक रोग सर्व्हेक्षण,प्राणिजन्य आजार नियंत्रण, राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रम

छत्रपती संभाजीनगर,४ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-येत्या कालावधीत जिल्ह्यात राबवावयाच्या विविध आरोग्य विषयक अभियानांच्या पुर्वतयारीचा आढावा आज जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीस जिल्हाधिकारी पाण्डेय यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मिना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, जागतिक आरोग्य संघटनेचे सर्व्हेक्षण वैद्यकीय अधिकारी डॉ. मुजीब सैय्यद, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. मंडलेचा आदी उपस्थित होते.

मिशन इंद्रधनुष्य 5.0

केंद्र शासन व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यात विशेष मिशन इंद्रधनुष्य 5.0 ही लसीकरण मोहिम  सोमवार दि.7 पासून राबविण्यात येणार आहे. बालकांमधील आजारांचे व मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी क्षयरोग, कावीळ-ब, पोलिओ, गोबर-रुबेला, घटसर्प, डांग्या खोकला, टिटॅनस, हिमोफिलम इन्फलुएझा टाईप बी, अतिसार, न्युमोनिया, मेंदुज्वर अशा आजारांसाठी बालकांचे लसीकरण केल्याने बालकांना सुरक्षित करता येते. त्यासाठी  दोन टप्प्यात हे अभियान राबविण्यात येणार आहे. लसीकरणापासुन वंचित असलेले व अर्धवट लसीकरण झालेल्या 0 ते5 वर्ष वयोगटातील बालकांचा व गरोदर मातांचा शोध घेऊन त्यांनाही लसीकरण करण्यात येणार आहे. या अभियानाची पहिली फेरी दि. 7 ते 12 ऑगस्ट, दुसरी फेरी दि. 11 ते 16 सप्टेंबर, तिसरी फेरी दि.9 ते 14 ऑक्टोंबर या दरम्यान राबविण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. या अभियानातून एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी खबरदारी घ्यावी,असे निर्देश जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी दिले.

जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समिती

अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिकांवर आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समिती असून या समितीची बैठक आज जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या समितीत अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा माहिती अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा समावेश आहे. गटविकास अधिकारी, ग्रामसेवक व सरपंच यांनी वैद्यकीय व्यावसायिकांना हरकत प्रमाणपत्र देताना कार्यक्षेत्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून खात्री करूनच प्रमाणपत्र द्यावे. अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिकांवर कार्यवाही करण्यासाठी पोलीस प्रशासनाची मदत घेण्यात यावी. सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांनी यंत्रणेमार्फत गोपनीय पद्धतीने चौकशी करून प्रत्यक्ष तपासणी करावी. अनधिकृत वैद्यकीय व्यवसायिकांच्या नोंदी घेऊन सुधारित यादी द्यावी. जिल्ह्यात अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या  व्यक्तिंना आळा घालावा,असे निर्देश जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी दिले.

एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम

            एकत्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमामध्ये उपलब्ध साधाने व यंत्रणेचा पुरेपुर वापर करुन साथीच्या उद्रेकांविषयी आवश्यक  प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाय योजना करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी दिल्या. जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत साथरोग सर्वेक्षणामध्ये फॉर्म-एस, फॉर्म-पी व फॉर्म-एल या यंत्रणेचा पुरेपुर वापर करुन नियमित माहिती संकलन व व्यवस्थापन करण्यात येईल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

वातावरणीय बदल व मानवी आरोग्य कार्यक्रम

 पर्यावरणातील बदलांमुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत स्थानिक स्वराज्य संस्थास्तरावर लोकप्रतिनिधींना प्रशिक्षित करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले. यात ग्रामीण, शहरी व महानगरपालिका क्षेत्राचा समावेश करुन त्याची कार्यप्रणाली निर्धारीत करुन अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही दिल्या. याबाबत जनजागृती होणे आवश्यक असून ‘वातावरणीय बदल व मानवी आरोग्य’  या विषयावर चर्चासत्रे आयोजित करावे. वायुप्रदुषण, जलप्रदुषण व ध्वनिप्रदुषण यांच्या दुष्परिणामांबाबत तसेच त्यामुळे उद्भवणारे उष्माघात, हृदय, फुफ्फुसांशी संबंधित आजार, डोळ्याचे आजार, मानसिक आजार, बहिरेपणा, कर्करेाग, त्वचारोग, इ. आजार व त्यावरील उपाय याबाबत लोकांना माहिती द्यावी,असेही त्यांनी सांगितले.

प्राणिजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम

प्राणिजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमात मध्ये प्राण्यांच्या सहवासात राहिल्याने अथवा मांस, अंडी, दूध इ. सेवनाने अथवा प्राण्यांचे लाळ, शेण, मूत्र इ. मुळे विषाणूंचा संसर्ग होऊन होणाऱ्या आजारांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत माहिती देण्यात आली. त्यात  प्राण्यांमध्ये क्षयरोग, रेबीज, बर्ड-फ्लु, स्वाइन-फ्लु, पांढरी हगवण, लाळ्या, खुरकूत, साल्मोनेलोसिस, लेप्टोस्पायरोसीस, स्क्रब-टायफस, चंडिपुरा इ. आजारांबाबत तसेच त्यामुळे मानवी आरोग्याला होणाऱ्या संभाव्य धोक्यांबाबत उपाययोजना सुचविण्यात आल्या. यात प्रामुख्याने श्वानदंशामुळे होणाऱ्या रेबिज सारख्या आजारासाठी लस उपलब्ध ठेवण्याबाबत निर्देश देण्यात आले.तसेच मानवी आरोग्य व्यवस्था व पशु आरोग्य व्यवस्था यांच्यामध्ये समन्वय ठेऊन प्राणिजन्य आजारावर विशेष लक्ष ठेवण्याबाबत सूचना त्यांनी दिल्या.