ओव्हरलोड वाळू वाहतुकीमुळे लाडगाव-वांजरगाव रस्त्याची दुरवस्था ग्रामस्थ आक्रमक ; नियमबाह्य वाळू उपसा व वाहतूक बंद करण्याची मागणी

नियमबाह्य वाळू उपसा व वाहतूक बंद करा अन्यथा एकही गाडी जाणार नाही – आ. रमेश बोरणारे 

वैजापूर,२२ जुलै /प्रतिनिधी :- लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गोदाधाम श्रीक्षेत्र सराला बेट (गोदाधाम) वर जाणाऱ्या लाडगाव वांजरगाव या रस्त्याची ओव्हरलोड वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे दयनीय अवस्था झाली आहे.

वांजरगाव शिवारात संभाजीनगर शहरासाठी सुरू असलेल्या महत्वकांक्षी अशा पाईपलाईनच्या कामाकरीता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वाळू उपसा करून वाहतुक करण्याचे निर्देश दिले होते ज्या अनुषंगाने सबंधित विभाग व कंत्राट घेतलेली एमजीपी कंपनीने या ठिकाणाहून वाळू उपसा सुरू केला. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेले नियम पायदळी तुडवत त्यांनी वाळूचा उपसा केला. तेव्हा ग्रामस्थांनी उपोषणे केली होती. यावेळी महसूल प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर कंपनीने विविध अटी शर्थी मान्य करून उपोषण सोडत पुन्हा काम सुरू केले. यावेळी वाळू वाहतूक करताना जिल्हा परिषद बांधकाम विभागाने या रस्त्याची क्षमता ८ टन असल्याचे पत्र महसूल विभागाला दिले होते व या रस्त्यावर ८ टन पेक्षा जास्त वाहतूक करणार नाही असे देखील सदरील कंपनीने लिहून दिले होते, मात्र संबंधित कंपनीने या रस्त्यावरून ३०-३५ टन वजनाची वाळू वाहतूक केली. ज्यामुळे या रस्त्याची दयनीय अवस्था झाली.

ग्रामस्थांनी दोन दिवसांपूर्वी वाळू वाहतूक करणारी वाहने पडकुन प्रशासनाच्या स्वाधीन केली. मात्र त्यांच्यावर आरटीओ ने गाडीच्या कागदपत्रांच्या कशनेतेनुसर निरक्षणे नोंदवत गाड्या महसूल विभागाला हस्तगत केल्या व महसूल विभागाने देखील या गाड्या परवाने तपासून सोडून दिल्या. यात ग्रामस्थांचा मूळ उद्देश धुळीत मिळाला व त्यांना समजले की या ठेकेदारावर कुठलीही करवाई प्रशासन करणार नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक होत उद्यापासून एकही गाडी चालू नये नसता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल असे पत्र तहसीलदार यांना दिले,

यातच आमदार रमेश पाटील बोरणारे यांनी आज वाळू साठा केलेल्या डेपोवर उपविभागीय अधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड, तहसीलदार सुनील सावंत यांना बोलावून घेत पाहणी केली. वाळू उपसा व वाहतूक करताना ठरवून दिलेला एकही नियम कंपनी पाळत नाही हे आ.बोरणारे यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. या अगोदरही  दोन ते तीन वेळेस तत्कालीन अधिकाऱ्यांना सुरू असलेल्या नियमबाह्य वाळू उपसाविषयी तक्रारी केल्यानंतर फक्त पंचनामे झाले कारवाई काही झाली नाही. मात्र आता ठरवून दिलेले नियम पाळले नाही यासोबतच रस्त्याची दुरुस्ती केली नाही तर एकही गाडी या ठिकाणाहून जाणार नाही आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालेल अशी आक्रमक भूमिका आ. बोरणारे यांनी घेतली.