वैजापूर तालुक्यात खरिपाच्या पेरण्या 98 टक्के पूर्ण ; पावसाचा खंड शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत

वैजापूर,२२ जुलै /प्रतिनिधी :- तालुक्यात या वर्षी आतापर्यंत झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्या जवळपास अंतिम टप्प्यात आल्या असून आतापर्यंत 98 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तालुक्यातील खरिपाचे एकूण क्षेत्र 1 लाख 34 हजार 894 हेक्टर क्षेत्र असून, या पैकी 1 लाख 26 हजार 956 हेक्टरवरील खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सर्वाधिक 63 हजार 105 हेक्टर क्षेत्रावर कापसाची तर 46 हजार 966 हेक्टर इतक्या क्षेत्रावर मका लागवड करण्यात आली आहे. 

दरम्यान, गेल्या दोन आठवड्यांपासून पावसात खंड पडला असल्याने शेतकऱ्यांना दमदार पावसाची  प्रतीक्षा आहे. तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 550 मि.मी. एवढे आहे. नैर्ऋत्य मोसमी पावसाने जून महिन्याच्या शेवट हजेरी लावली. तर जुलै महिन्याच्या सुरुवातीला दमदार पाऊस झाला. परंतु त्यानंतर पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. मागील खरीप हंगामात  कापसाला अपेक्षित भाव मिळाला नाही. तरीदेखील यंदा शेतकऱ्यांनी 63 हजार 105 हेक्टर क्षेत्रावर कापूस व त्याखालोखाल 49 हजार 966 हेक्टरवर मका लागवड केली आहे. याशिवाय बाजरी, सोयाबीन, भुईमूग, मूग, उडीद, तूर, तृणधान्य यांची 13 हजार हेक्टर इतक्या क्षेत्रात लागवड करण्यात आली आहे. तर भाजीपाला 53 हेक्टर, चारा 196 हेक्टर व 15 हेक्टर इतक्या क्षेत्रावर फळपिकांची लागवड करण्यात आली आहे. बोरसर महसुल मंडळात कापसाची सर्वाधिक म्हणजेच 7 हजार 121 हेक्टर तर सर्वात कमी जानेफळ महसूल मंडळात 3 हजार 771 हेक्टर क्षेत्रावर  लागवड पार पडली आहे.  सर्वाधिक मका पिकाची जानेफळ महसूल मंडळात 5 हजार 49 हेक्टर क्षेत्रावर व सर्वात कमी गारज मंडळात 3 हजार 24 हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. 

——————————–

तालुक्यात सरासरी 98 टक्के पेरण्या झालेल्या आहेत. सध्या मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तरी शेतकऱ्यांनी याबाबत दक्ष राहून कृषी विभागाने दिलेल्या सल्ल्यानुसार किटकनाशकांची फवारणी करावी.

व्ही. एस. ठक्के ता.कृषी अधिकारी, वैजापूर

————————————–