डोणगाव येथे तलवार घेऊन फिरणाऱ्या तरुणाविरुध्द गुन्हा

वैजापूर ,​२​ जानेवारी  / प्रतिनिधी :- नागरिकांवर दहशत माजविण्यासाठी तलवार बाळगणाऱ्यास वीरगाव पोलिसांनी पकडून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 30 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास तालुक्यातील डोणगाव येथे पोलिसांनी ही कारवाई केली.

       गोकुळ गुलाब थोरात (26) रा.डोणगाव असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकुळ थोरात हा शुक्रवारी रात्री सव्वाअकरा वाजेच्या सुमारास डोणगाव येथे भांडण करून आरडाओरड करीत असून त्याच्या हातात तलवार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वीरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे, हवालदार विजय खोकड, अजय बावस्कर आदींच्या पथकाने तालुक्यातील डोणगाव येथे  जाऊन शहानिशा केली असता गोकुळ थोरात हा जखमी अवस्थेत दिसून आला. पोलिसांनी त्याच्याकडून तलवार हस्तगत करून त्याला उपचारासाठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी गोकुळ थोरात याच्याविरुद्ध शस्त्रबंधी कायद्यान्वये  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.