वैजापूर तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताहास सुरुवात

वैजापूर ,२८ जून  /प्रतिनिधी :- एक जुलै रोजी असणाऱ्या कृषि दिनाच्या पार्श्वभुमीवर वैजापूर तालुक्यात 25 जुनपासून कृषि संजीवनी सप्ताहास सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने एक जुलै पर्यंत गावोगावी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार सप्ताहाच्या सुरुवातीला विविध पिकांचे तंत्रज्ञान प्रसार, मुल्यसाखळी बळकटीकरण दिन व पौष्टिक तृणधान्य दिन साजरा करण्यात येऊन शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.

सोमवारी (27 जुलै) महिला कृषि तंत्रज्ञान सक्षमीकरण दिन घेण्यात आला. या सप्ताहात खतांचा संतुलित वापर दिन, प्रगतीशिल शेतकरी संवाद दिन, शेती पुरक व्यवसाय तंत्रज्ञान दिन असे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये राज्य पुरस्कृत एकात्मिक कापुस व सोयाबीन पिकांची उत्पादकता वाढ व मुल्य साखळी विकसित कार्यक्रमांतर्गत समुह बांधणी व क्षमता बांधणी कार्यक्रम घेण्यात आला. प्रगतीशील शेतकरी संवाद दिनांतर्गत शेतावर क्षेत्रीय भेटीचे आयोजन, युट्युबच्या माध्यमातुन शेतकऱ्यांच्या कार्यशाळा भरवून त्यांच्या यशोगाथा सादर करणे हे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. खरीप हंगामाच्या सुरुवातीला होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये शास्त्रज्ञ, कृषि अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच प्रगतीशील शेतकरी यांचे शेतीविषयक मार्गदर्शन होणार आहे. शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषि अधिकारी अशोक आढाव यांनी केले आहे