वैजापूर तालुक्यात संजय गांधी निराधार – श्रावण बाळ योजनेचे अनुदान चार महिन्यापासून रखडले, वृद्ध -निराधारांची दिवाळी अंधारात

वैजापूर ,२९ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-राज्य व केंद्र शासनातर्फे वृद्ध, निराधार व्यक्ती व विधवा महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार योजना व अन्य योजनांचे अनुदान गेल्या चार महिन्यापासून रखडल्यामुळे लाभार्थ्यांचे हाल होत आहेत. अनुदान न मिळाल्यास लाभार्थ्यांवर दिवाळी अंधारात साजरा करण्याची वेळ येणार आहे.

Shravan Bal Yojana 2021: Apply Online, Beneficiary List, Application Status


वैजापूर तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे  सर्वसाधारण लाभार्थी 2750, अनु.जाती लाभार्थी 831,अनु जमाती लाभार्थी 132, श्रावनबाळ योजनेचे सर्वसाधारण  लाभार्थी 6731,अनु.जाती लाभार्थी 1738,अनु.जमाती लाभार्थी 439,इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना लाभार्थी 8908,इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजना लाभार्थी 353 व राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना लाभार्थी 20 असे एकूण 21 हजार 902 लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना जुलै महिन्यापर्यंतचे अनुदान वाटप करण्यात आले आहे .

ऑगस्ट,सप्टेंबर व ऑक्टोबर या तीन महिन्याचे अनुदान वाटप झालेले नाही. गेल्या तीन महिन्यांपासून लाभार्थ्यांना अनुदान मिळाले नाही त्यामुळे वृद्ध- निराधारांचे हाल होत असून,दिवाळी अंधारात साजरी करण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे.अनुदान खात्यावर जमा झाले की नाही हे पाहण्यासाठी लाभार्थी बँकांमध्ये चकरा मारत असून, अद्यापही त्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा न झाल्यामुळे त्यांची निराशा होत आहे.त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार व श्रावनबाळ योजनेची अनेक प्रकरणे मंजुरी अभावी तहसील कार्यालयात पडून आहेत. लाभार्थ्यांचे रखडलेले अनुदान शासनाने दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यांवर जमा करावे अशी मागणी माजी नगराध्यक्ष साबेर खान यांनी केली आहे.