वस्तु विकत घेतलेल्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत परत करण्याचा अधिकार

औरंगाबाद जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे सदस्य संध्या बारलिंगे यांची मुलाखत

Displaying DSC_2197.JPG

24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक हक्क् दिन, यानिमित्ताने जागरुक ग्राहक म्हणून कोणकोणत्या गोष्टीची माहिती असणे आवश्यक आहे, तसेच ग्राहक म्हणून कोणकोणते अधिकार प्राप्त आहेत याविषयी मुलाखतीच्या माध्यमातून घेतलेली माहिती.. 

प्रश्न . ‘ग्राहक हक्क’ म्हणजे नेमके काय ?

        उत्तर :- एखादी वस्तू किंवा सेवा विकत घेताना ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला पुढील सहा हक्क मिळाले आहेत. यामध्ये सुरक्षेचा हक्क….आपण एखादी वस्तू विकत घेतो तेव्हा त्या वस्तूच्या सुरक्षिततेची पूर्ण हमी उत्पादकांनी घेणे अनिवार्य असते. 2) माहितीचा हक्क…एखाद्या उत्पादनाबद्दल सर्व माहिती मिळवणे  हा ग्राहकांचा हक्क आहे. त्या उत्पादनाची गुणवत्ता, प्रमाण, संख्या, शुद्धता, किंमत या सर्वांची माहिती मिळवण्याचा हक्क आहे. 3) निवड करण्याचा अधिकार.. बाजारात उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी एक पर्याय निवडण्याचा ग्राहकांना अधिकार आहे. 4) म्हणणे मांडण्याचा हक्क….जर तुम्हाला वाटत असेल तुमची फसवणूक झाली आहे तर तुम्हाला तुमचे म्हणणे योग्य ठिकाणी मांडण्याचा पूर्ण हक्क आहे. ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी सरकारने तक्रार निवारण केंद्र आणि ग्राहक न्यायालयांची स्थापना केली आहे. 5) तक्रार करण्याचा आणि निवारण करून घेण्याचा हक्क. 6) ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार … ग्राहकांनी आपले हक्क काय आहेत हे नेहमी जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

प्रश्न . ग्राहक हक्क तक्रार निवारण समितीकडे कोणकोणत्या तक्रारीवषियी दाद मागता येते ?

        उत्तर :- विकत घेतलेली वस्तु अथवा सेवा सदोष असेल तर,  तुमची आर्थिक फसवणूक झालेली असेल तर , चुकीच्या आमिषाला अथवा जाहिरातीला बळी पडून त्यात नुकसान झाले तर आणि MRP पेक्षा जास्त रक्कम आकारली असेल इ. तक्रारीकरिता ग्राहक हक्क तक्रार निवारण आयोगासमोर  दाद मागता येते.

प्रश्न .  ग्राहकाची जर फसवणूक झाली आहे हे लक्षात आल्या नंतर अर्ज करण्याची प्रक्रिया आणि तो कुठे करावा याविषयी काय सांगाल ?

        उत्तर :- ग्राहकाची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आर्थिक अधिकार क्षेत्रतेनुसार तक्रार दाखल करावी लागते.  त्यासाठी जिल्हा पातळीवर जिल्हा आयोग ज्याची आर्थिक अधिकार क्षेत्रता एक कोटी पर्यन्त  आहे, राज्य आयोगाची अधिकार क्षेत्रता एक कोटी ते 10 कोटी पर्यन्त आहे आणि राष्ट्रीय आयोगासमोर 10 कोटी आणि त्यापुढील तक्रारी दाखल करता येतात. उदा: तुम्हाला झालेले आर्थिक नुकसान 1 कोटी पर्यन्तचे असेल जिल्हा तक्रार निवारण समितीच्या कार्यालयात तुम्हाला विशिष्ट नमुन्यात तक्रार अर्ज दाखल करावा लागतो. त्या अर्जामध्ये तुमचे नाव पत्ता, विरुद्ध पक्षाचे नाव व पत्ता, सुरूवातीला नमूद करयाचे. त्यानंतर तुमची तक्रार अतिशय मोजक्या आणि स्पष्ट शब्दात मांडायची. त्यामध्ये सुरूवातीचा परिच्छेदामध्ये व्यवहार झालेला दिवस तारखेनिशी आणि तुम्ही त्याला किती रक्कम दिली याचा स्पष्ट उल्लेख असावा. त्यानंतर  वस्तु अथवा सेवा कशा रीतीने सदोष आहे याचे वर्णन असावे. तुम्ही विरूद्ध पक्षाकडे तक्रार केली असेल किंवा नोटिस पाठवली असेल तर त्याचा उल्लेख असावा आणि शेवटी तुम्ही विरूद्ध पक्षाकडून मागणी करत असलेल्या नुकसान भरपाई बद्दल स्पष्ट शब्दात उल्लेख असावा. तुम्ही व्यक्तिशः जाऊन तक्रार करणे अशक्य असल्यास तुम्हाला [email protected] या वेबसाइट वरुन  तक्रार दाखल करता येते. तसेच ग्राहक आयोगाच्या ConfoNet या अधिकृत संकेत स्थळावर जाऊन तिथे दिलेल्या निर्देशानुसार ऑनलाइन तक्रार नोंदवता येते.

प्रश्न :  ऑनलाइन खरेदीदार हा एक ग्राहक असतो, जर ऑनलाइन खरेदीत फसवणूक झाली तर कोणत्या पद्धतीने ग्राहकांला फसवणूकी विरुद्ध न्याय मिळू शकतो याविषयी सांगा?

उत्तर :- ऑनलाइन खरेदी करणारा ग्राहक देखील वरील प्रमाणे आर्थिक अधिकार क्षेत्रतेनुसार योग्य त्या आयोगासमोर तक्रार करू शकतो. तक्रारीमध्ये प्रतिवादीचे नाव समाविष्ट करताना सदोष वस्तु विकत घेतलेले ऑनलाइन प्लॅटफॉर्म , वस्तूची विक्री करणारा विक्रेता आणि वस्तू उत्पादन करणारी कंपनी यांना PRODUCT LIABILITY अंतर्गत जाब विचारण्याचा अधिकार आहे.    

प्रश्न 5. खरेदी करताना ग्राहकांनी कोणती काळजी घ्यावी?

        उत्तर :- अनेक वेळा माल घेतल्यानंतर फसवणूक झाली, की केवळ बिलावर दिलेला माल परत घेतला जाणार नाही, अशी टीप पाहून तक्रार करण्याचे टाळले जाते. मुळात अशी टीप टाकणे बरोबर आहे की चूक आहे, हे अनेकांना माहीत नसते. कोणतीही गोष्ट खरेदी केली, की प्रथम बिल घेणे गरजेचे आहे. बिल घेतल्यामुळे अनेक फायदे होतात, हे लक्षात ठेवले पाहिजे .त्यामुळे खरेदी करताना ग्राहकाने वस्तूचे बिल घेणे आवश्यक आहे. तसेच वस्तु सदोष अथवा निकृष्ट दर्जाची असेल तर  ती वस्तु विकत घेतलेल्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत परत करण्याचा अधिकार 2019 मध्ये अंमलात आणलेल्या ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहकास आहे.

प्रश्न . आपण नागरिकांना काय आवाहन कराल?

       उत्तर:- अनेक योजना, स्कीमला भुलण्यामुळे ग्राहकांची फसवणूक होते. त्यामुळे त्यांच्यावर पश्चातत्तापाची वेळ येते. मात्र, ग्राहकांनी कोणतीही वस्तू खरेदी करताना खबरदारी, दक्षता घेतली, तर त्यांच्यावर अशी वेळच येणार नाही. फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी उपभोगावर संयम ठेवून व्यवहार करणे गरजेचे आहे. अनेक माध्यमातून येणाऱ्या जाहिरातींच्या मोहजालात अडकविण्यासाठी उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी लावलेल्या सोनेरी सापळ्यात ग्राहकांनी अडकून पडू नये. अशा कंपन्यांपासून दूर राहणे आवश्यपक आहे. सेल, फ्री गिफ्ट, ठेवींवर अवास्तव व्याज देणाऱ्या संस्था, विविध स्कीम, योजना यांना भुलून फसवणूक टाळण्याची गरज आहे. ऑनलाइन व्यवहार करताना अथवा दुकानातून वस्तु खरेदी करताना अत्यंत काळजीपूर्वक डिजिटल कार्डस अथवा net banking चा वापर करणे अनिवार्य आहे. तुमचा कार्डचे डिटेल्स अथवा OTP ची मागणी करणारा कोणत्याही व्यक्तीच्या कॉलला उत्तर देऊ नये आणि कार्ड ची माहिती देऊ नये. RESERVE BANK OF INDIA आणि इतर बँका वेळोवेळी लोकांना सावध करण्याचे कार्य करत असतात. तरीही फसवणुकीचे प्रकार थांबलेले नाहीत. त्यासाठी ग्राहक संस्था आणि  ग्राहक चळवळीसाठी काम करणार्याच संघटनांनी  ग्रामीण भागात आणि कमी शिक्षित वर्गामध्ये जन जागृती होणे आवश्यक आहे. ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी, तसेच ग्राहक म्हणून जनतेला असलेले अधिकार व कर्तव्ये यांची माहिती देण्यासाठी पथनाट्य, पपेट शो, नुक्कड नाटक, मॅरेथॉन शर्यती वा अन्य अनुषंगिक उपक्रमांचे आयोजन करावे लागणार आहेत. याशिवाय साइन बोर्ड, भित्तीचित्र, होर्डिंग्ज तयार करून भाजी बाजार व अन्य गर्दीच्या ठिकाणी ती लावावी लागणार आहेत. ग्राहकाला ग्राहक संरक्षण कायद्याद्वारे  मिळालेल्या मजबूत सुरक्षा कवचाचे ज्ञान जनमानसात अवगत केल्यानंतरच  ग्राहक राजाच्या फसवणुकीला आळा बसेल. संपर्कासाठी पत्ता : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, जिल्हाधिकारी कार्यालय, तळ मजला, औरंगबाद.संपर्क क्र.0240-2321202  

                                                                        शब्दांकन :- मीरा  ज्ञानदेव ढास

                                माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय,औरंगाबाद