नागरिकांनी ग्राहक हक्काबाबत जागरुक राहावे-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद,२४ डिसेंबर/प्रतिनिधी:-  नागरिकांनी ग्राहक म्हणून कोणत्याही वस्तुची खरेदी करित असताना, पक्क्‌या बिलाच्या पावतीची मागणी करावी, जेणेकरुन वस्तूच्या खरेदीत बनावट वस्तूच्या खरेदीतून फसवणूक टाळता येईल, तसेच नोंदणी कृत पावती असलेल्या विक्रेत्याकडून नागरिकांनी खरेदी करुन स्वत:च्या ग्राहक हक्काबाबत जागरुक राहावे असे आवाहन आज जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन प्रबोधनात आयोजित जाणिव जागृतीच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.

            या कार्यक्रमास ग्राहक तक्रार निवारण मंचच्या सदस्या श्रीमती संध्या बारलिंगे, अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब शिंदे, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, संगीता सानप, संगीता चव्हाण यांच्यासह ग्राहक तक्रार निवारण समिती व जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी – कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

Displaying DSC_2168.JPG

            श्रीमती संध्या बारलिंगे यानी ग्राहक तक्रार निवारण मंचाचे कामकाज, ग्राहक हक्क संरक्षण कायद्याच्या निर्मितीची पार्श्वभूमी, त्याचप्रमाणे सुधारित 2019 मध्ये पारित झालेल्या ग्राहक हक्क संरक्षण कायद्यातील तरतूदीची माहिती कार्यक्रमात दिली. ज्याप्रमाणे नागरिकांना इतर अधिकार राज्य घटनेने प्राप्त झाले आहेत. त्याच प्रमाणे ग्राहकांचेही हक्क व अधिकार प्राप्त आहे. जाहिरातीतील माहिती व प्रत्यक्ष वस्तूची गुणवत्ता यात फरक आढाळला असेल किंवा नामांकित कंपन्याकडून ऑनलाइन खरेदी केली असेल आणि यात फसवणूक झाली तर अन्यायकारक करार व जाचक अटी, Unfair Contract याविषयी ग्राहक तक्रार निवारण समितीकडे दाद मागता येते. यासाठी ग्राहकांनी फसवणूक झाल्याबाबत न्याय मागण्यासाठी जिल्हा ग्राहक  तक्रार निवारण समितीकडे अर्ज करण्याचे अवाहनही या कार्यक्रमात केले.

            बाजारात ग्राहकांना योग्य सेवा देणे ही उत्पादक व विक्रेत्याचे जसे काम आहे. त्याच प्रमाणे शासकीय अधिकारी यांनी शासकीय कार्यालयात येणांऱ्या प्रत्येक अभ्यागतांना प्रामणिक सेवा देऊन आपल्या कामाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण पद्धतीने सेवा द्यावी. तसेच व्यक्ती जन्मापासून मृत्यूपर्यंत एक ग्राहक असतो. यामळे प्रत्येक वस्तूच्या खरेदीत नागरिकांनी जागरुक राहावे असे विचार कार्यक्रमाच्या समारोपात अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी व्यक्त केले.