विधानपरिषद लक्षवेधी:औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अनियमिततेची चौकशी करणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास सर्वोच्च प्राधान्य – गृहमंत्री अनिल देशमुख

अंबादास दानवे यांची  औरंगाबाद शहरातील शासकीय घाटी रुग्णालयात मनमानी कारभार व आर्थिक घोटाळे आदी प्रकाराबाबत लक्षवेधी सूचना

मुंबई,२३ डिसेंबर /प्रतिनिधी:- औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये झालेल्या अनियमिततेची पंधरा दिवसात चौकशी करण्यात येईल तसेच दोषींवर कारवाई केली जाईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले.  सदस्य विक्रम काळे यांनी याबाबत उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते.

श्री.सामंत म्हणाले, औरंगाबाद येथील विद्यापीठातील अनियमिततेसंदर्भात स्वतः राज्यपाल यांची भेट घेतली असून या विद्यापीठासह इतर विद्यापीठातील अनियमिततेच्या संदर्भातही चर्चा केली आहे. कुलगुरु यांच्या हाताखालील अधिकारी, कर्मचारी यात दोषी आढळल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल. मात्र विद्यमान आणि माजी  कुलगुरु यांच्या विरोधात चौकशी सुरु करण्यापूर्वी विधी व न्याय विभागाचे मत विचारात घेतले जाईल, असेही ते म्हणाले.

राज्यातील अनेक विद्यापीठांनी लेखा परिक्षण अहवाल सादर केले नसल्याचे सांगून श्री.सामंत म्हणाले, मुंबई विद्यापीठ, एस एन डी टी, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर या विद्यापीठांनीही गेल्या काही वर्षांपासून लेखा परीक्षण अहवाल सादर केले नसल्याचे त्यांनी एका उपप्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.

या विषयावरील झालेल्या कार्यवाहीचा अहवाल पुढील अधिवेशनात सादर करण्याचे निर्देश उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी यावेळी दिले. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री नागोराव गाणार, अंबादास दानवे आदिंनी सहभाग घेतला होता.

अग्नि प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी सल्लागार नोडल एजन्सीची नेमणूक विचाराधीन – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

अंबादास दानवे यांची लक्षवेधी सूचना

राज्यातील वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये अग्नि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, त्यानुषंगाने अंदाजपत्रक तयार करणे, संबंधित प्राधिकरणाच्या आवश्यक परवानग्या प्राप्त करणे, संस्थेतील अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देणे व अग्नि सुरक्षेसाठी सल्ला देण्याकरिता नोडल एजन्सी नियुक्त करण्याबाबत अभिव्यक्ति स्वारस्याचा मसुदा तयार करण्यात आला असून तो शासनाच्या विचाराधीन आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनेवेळी दिली.

सदस्य अंबादास दानवे यांनी औरंगाबाद शहरातील शासकीय घाटी रुग्णालयात मनमानी कारभार व आर्थिक घोटाळे आदी प्रकाराबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.

वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री.देशमुख म्हणाले, राज्यातील शासकीय रुग्णालयामध्ये अग्नि प्रतिबंधक सुरक्षा अधिक सक्षम कशी करता येईल, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शासकीय रुग्णालयांना भेटी देऊन अग्नि प्रतिबंधक सुरक्षेबाबत सूचना केल्या आहेत. याबाबत आराखडा तयार करण्याचे काम सुरु आहे. कुठल्याही रुग्णालयात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पूर्णत: प्रयत्न करण्यात येत आहोत.

नेत्रपेढीच्या दृष्टीने विभागाला सूचना दिल्या जातील. त्यासाठी लागणारी मान्यता देण्यात येणार असल्याचेही श्री.देशमुख यांनी सांगितले. साहित्य व उपकरणे खरेदी प्रकरणामध्ये हाफकीनकडून कुठलीही दिरंगाई होऊ नये, यामध्ये सुलभता येण्यासाठी पाऊले उचलली जातील.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद येथे वाढत्या विद्युत मागणीचा विचार करता सर्जिकल इमारतीची वायरींग बदलण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेले अंदाजपत्रक तपासून त्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद येथे ३ ऑक्सिजन निर्मिती प्लान्ट आहेत, त्यापैकी दोन प्लान्ट प्रधानमंत्री योजनेअंतर्गत असून, एक सी.एस.आर. फंडातून आहे व तीनही प्लान्ट है कार्यरत आहेत. कोविड-१९ च्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये हे प्लान्ट उपयुक्त ठरु शकतील. प्लान्ट नियमित सुरु राहाण्यासाठी जनित्र आणि ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता असते, त्यासाठी जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव देण्यात आला होता. त्यापैकी दोन जनित्र प्राप्त झालेले असून सार्वजनिक बांधकाम (विद्युत) विभागामार्फत प्रस्थापित करण्याची कार्यवाही सुरु आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद संस्थेने कोविड-१९ च्या संकटकाळात औरंगाबाद प्रशासकीय विभाग तसेच मराठवाड्यातील इतर लगतच्या जिल्ह्यामध्ये उल्लेखनीय काम केलेले आहे. संस्थेने कोविड-१९ च्या पहिल्या लाटेमध्ये असणारी ४५८ बेडची संख्या दुसऱ्या लाटेमध्ये १००० बेडपर्यंत वाढविली आहे. तसेच १२.५ मेट्रीक टन क्षमतेच्या १ लिक्विड मेडिकल ऑक्सिजन प्लान्टची संख्या ९५ मेट्रीक टन क्षमतेच्या १० लिक्विड मेडिकल ऑक्सिजन प्लांटपर्यंत वाढवून हा वाढीव ऑक्सिजन प्रामुख्याने कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेमध्ये इतर जिल्ह्यांना पुरविला आहे.

कोविड-१९ च्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये तत्पर व दर्जेदार सेवा उपलब्ध करुन दिलेली आहे व भविष्यातही घाटी रुग्णालयात अशी सेवा कायम पुरविण्यास शासन कटीबद्ध आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद येथील विविध इमारतीचे सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग तसेच राष्ट्रीय सुरक्षा परिषद, नवी मुंबई यांनी सुरक्षा परिक्षण केले असून सुरक्षा परिक्षणाचा अहवाल प्राप्त झाला आहे. रुग्णालयामध्ये आगसदृश्य घटना किंवा अनुचित प्रकार घडू नये या करिता संस्थेतील अधिकारी व कर्मचारी यांना अग्निशमन विभागामार्फत अग्नीशमन यंत्रणा वापराबाबतचे प्रशिक्षण दिले असून सद्यस्थितीत प्रतिबंधक उपाययोजना म्हणून अग्निशमन सिलेंडर स्थापित करण्यात आले आहेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाला इतर महाविद्यालये संलग्न करण्यासाठी समिती स्थापन करणार –उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

कोकणातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाला राज्यातील इतर महाविद्यालये संलग्न करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार असून ही समिती आपला अहवाल सहा महिन्यात सादर करेल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना दिली.

सदस्य अभिजित वंजारी यांनी राज्यात असलेल्या शासकीय विद्यापीठात संलग्नित महाविद्यालयांची गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात होणारी वाढ याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी श्री.सामंत बोलत होते.

श्री.सामंत म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, हे संलग्न विद्यापीठ असून या विद्यापीठास अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुशास्त्र आणि खाद्यपेय व्यवस्था तंत्रशास्त्र अभ्यासक्रम शिकविणाऱ्या महाविद्यालयांना संलग्नता देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, विद्यापीठ अधिनियम कलम ४(१) नुसार या विद्यापीठाचे अधिकार क्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ अधिनियम २०१४ अस्तित्वात येण्यापूर्वी राज्यात अस्तित्वात असलेल्या अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुशास्त्र आणि हॉटेल व्यवस्थापन व खाद्यपेय व्यवस्था तंत्रशास्त्र हे अभ्यासक्रम शिकविणाऱ्या महाविद्यालयांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची संलग्नता घेणे कलम ४ (२) नुसार वैकल्पिक आहे. तर, कलम ४ (३) नुसार, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, वास्तुशास्त्र परिषद किंवा औषधविद्या परिषद् यांच्या कार्यकक्षेखाली येणाऱ्या व्यवस्थापनाखेरीजच्या, पदवी आणि त्यावरील स्तरांवरील नव्याने स्थापन होणाऱ्या संस्थांकरिता संबंधित प्रदेशांतील विद्यापीठांच्या परवानगीशिवाय, राज्य शासनाच्या पूर्व मान्यतेने, संलग्नता देण्याची तरतूद आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ अधिनियम, २०१४ मधील कलम ३(६) नुसार विद्यापीठ मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद याठिकाणी प्रादेशिक केंद्र सुरु करेल तसेच विद्यापीठास अन्य ठिकाणीही प्रादेशिक केंद्रे स्थापन करता येतील, अशी तरतूद आहे. त्याचप्रमाणे कलम ३(७) नुसार विद्यापीठास कोल्हापूर, सोलापूर, अमरावती, नांदेड, जळगाव येथे, तसेच विद्यापीठास आवश्यक वाटेल अशा अन्य ठिकाणी उपकेंद्रे स्थापन करता येतील, अशी तरतूद आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्रादेशिक केंद्र औरंगाबाद येथे सुरु करण्यात आले आहे. तसेच, विद्यापीठाचे उपकेंद्र सोलापूर येथे सुरू करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर विद्यापीठाची अन्य प्रादेशिक व उप केंद्रे स्थापन करण्याची कार्यवाही विद्यापीठ स्तरावर सुरु आहे.

५० विद्यापीठाचा सन २०१७ ते २०२१ या कालावधीचा बृहद् आराखडा तयार करण्यात आला असून तो विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच, सन २०२२ ते २०२६ या कालावधीचा वृहद् आराखडा तयार करण्याची कार्यवाही विद्यापीठ स्तरावर सुरू आहे.