अतिरिक्त आयुक्ताच्‍या कानशिलात लगावणाऱ्या रवी बाबुराव गायकवाड याला कोर्ट उठेपर्यंत शिक्षा

औरंगाबाद,१७ डिसेंबर /प्रतिनिधी:-औरंगाबाद महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्ताच्‍या कानशिलात लगावणाऱ्या रवी  बाबुराव गायकवाड (४१, रा. बौध्‍दभूषण, संभाजी कॉलनी, एन-६, सिडको) याला कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि विविध कलमांन्‍वये पाच हजार रुपयांचा दंड जिल्हा व सत्र न्‍यायाधीश व्‍ही.एस. कुलकर्णी यांनी ठोठावला.

या  प्रकरणात महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्‍ण वसंतराव भालसिंग यांनी फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, २२ जून २०१८ रोजी रात्री दीड वाजेच्‍या सुमारास पावसाच्‍या पाण्‍याने एन-६ सिडको येथील संभाजीनगरातील नालातुडूंब भरला होता. त्‍या नाल्यात बुलेट स्‍वार पडून त्‍याचा मृत्यू झाला. त्‍याच दिवशी सकाळी साडेदहा वाजेच्‍या सुमारास मनपाचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त आणि इतर अधिकारी, कर्मचारी घटनास्‍थळाच्‍या पहाणीकरण्‍यासाठी गेले होते. पाहणी करित असताना तेथे नगरसेवक आणि परिसरातील १५ ते २० नागरिक आले. त्‍यांनी नाल्याचे काम क‍रित नाही म्हणत गाऱ्हाणी  करु लागले, मात्र मनपाच्‍या इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी  त्‍यांना समजावून सांगितले. त्‍याचवेळी आरोपी रवी  गायकवाड हा फिर्यादी भालसिंग यांच्‍या समोर आला, त्‍याने मनपाचे अधिकार फुकटाचा एक-एक लाख पगार घेतात, काम करीत नाही. यांना ठोकले पाहिजे असे म्हणत अतिरिक्त आयुक्त भालसिंग यांच्‍या कानशिलेत लगावून मोठ-मोठ्याने आरडा-ओरडा करीत तुम्ही कशा ड्युट्या करतात ते मी पाहतो असे म्हणुन धमकी दिली.या   प्रकरणात सिडको पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

या  प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्‍यात आले. खटल्याच्‍या सुनावणीवेळी, सहाय्यक लोकअभियोक्ता उल्हास पवार यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदवले. प्रकरणात दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून भारतीय दंड विधानाच्या कलम ३५३ आणि ३३२ अन्‍वये कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि प्रत्‍येकी अडीच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिन्‍याचा साध्‍या कारावासाची शिक्षा ठोठावली.