राहुल गांधींना पोलिसांनी ढकलले की तेच पडले?; भाजपचा सवाल

औरंगाबाद : हाथरस येथील बलात्कार पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला.यामुळे काँग्रेसने उत्तर प्रदेश व केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवत आंदोलनाची हाक दिली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मात्र या संदर्भात काहीशी वेगळी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दरेकर यांनी खरंच राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केली की ते स्वतःच पडले असा सवाल उपस्थित केला.

Image

विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या मराठवाडा दौ-याला आजपासून प्रारंभ झाला. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेत-पीकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतक-यांची हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. आज दरेकर यांनी फुलंब्री येथे चौक गाव, मानमोडी शिवार तसेच कन्ऩड तालुक्यातील नाचनवेल गावामध्ये जाऊन अतिवृष्टी झालेल्या व पुराने बाधित झालेल्या शेतक-यांच्या शेतीच्या नुकसानीची पाहणी केली.औरंगाबाद येथे ते पत्रकारांशी बोलत होते. राहुल गांधी यांच्यासोबत खरोखरच काही चुकीचे वर्तन झाले असेल तर प्रशासन त्याची नक्कीच गंभीर दखल घेईल. कुठल्याही नेत्याला अशाप्रकारे धक्काबुक्की होणं योग्य नाही. पण तसं काही झालं आहे असं मला वाटत नाही. राहुल गांधी यांना नेमकं ढकलून दिलंय की ते पडलेत हा विषय संशोधनाचा आहे. तो तपासला जाईल,’ असे दरेकर म्हणाले. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अनेकदा आमच्यावरही अशा प्रकारची कारवाई करतात. सायन हॉस्पिटलच्या बाहेर आंदोलनाला बसल्यानंतर माझ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. माझ्यासह आमच्या आमदारांवर गुन्हे दाखल झाले. पोलिसांना कायदा-सुव्यवस्था महत्त्वाची वाटली, आम्हाला लोकांचा प्रश्न महत्त्वाचा वाटला. असं होत असतं. काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाचे नेते असलेल्या राहुल गांधी यांना पोलीस ढकलून देतील असं मला वाटत नाही. इतके पोलीस संवेदनाहीन नाहीत. मग ते कुठलेही असोत,’ असेही दरेकर पुढे म्हणाले.

‘हाथरसची घटना दुर्दैवीच आहे. आम्हीही या घटनेचा निषेध केलाय. मात्र, विरोधक यात राजकारण करत आहेत. पुण्यात एका तरुणीला ठेचून डोंगरात टाकून दिलं. रोह्याला १४ ते १५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिला दरीत ढकलून दिलं. पनवेलच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार झाला. नुकताच एका डॉक्टरनं क्वारंटाइन सेंटरमध्ये महिलेचा विनयभंग केला. यातल्या कुठल्या घटनेची जबाबदारी स्वीकारून उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला?,’ असा प्रश्नही त्यांनी केला.’आपल्या पायाखाली काय जळतंय बघा. महाराष्ट्रात रोज काही ना काही होतंय. कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाय. राजीनामेच मागायचे झाले तर तुमचे रोज राजीनामे मागावे लागतील. हाथरसच्या विषयावर राजकारण करण्याची संधी यांना मिळालीय. ती त्यांनी साधली आहे आणि आम्हाला सांगतात राजकारण करू नका. हाथरसच्या घटनेवर बोलणारे संजय राऊत महाराष्ट्रातील घटनांवर का बोलले नाहीत? गृहमंत्र्यांनी एखाद्या ठिकाणी भेट दिली नाही?,’ अशा प्रश्नांची सरबत्तीच त्यांनी केली.हाथरसच्या घटनेवरून योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा मागणाऱ्या विरोधकांचाही त्यांनी समाचार घेतला.

शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा अन्यथा भाजपा रस्त्यावर उतरेल – विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर

फुलंब्री, कन्नडमधील शेतक-यांशी साधला संवादऔरंगाबाद, दि. २- राज्यामधील विशेषत: मराठवाड्यतील शेतकऱ्यांना ओला दुष्काळाशी सामना करावा लागतोय. राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे अतिवृष्टी झालेल्या भागांच्या शेतकऱ्यांचे विलंब न करता सरसकट पंचनामे करावे.बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्‍टरी ५० हजार रुपये तर कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २५ हजार रुपयांची त्वरित मदत करण्याची आग्रही मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज केली.

Image

अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतक-यांच्या जमिनीच्या नुकसानीचा अंदाज घेतला. बांधावर जाऊन शेतक-यांशी संवाद साधला. शेतक-याला दरेकर यांनी धीर दिला व सरकारकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आग्रह धरण्याचे वचनही दरेकर यांनी दिले.विरोधी पक्षनेते दरेकर यांनी पत्रकार परिषदेत मराठवाड्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कपाशी, बाजरी या पिकांच्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे.

Image

या विभागांमध्ये झालेल्या नुकसानाची पाहणी करून दरेकर यांनी औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या भागात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. शेतकऱ्यांना पीक विमा त्वरित देण्यात यावेत अशी मागणी करताना प्रविण दरेकर यांनी याबाबत सरकारने आठवड्याभरात निर्णय नाही घेतला तर भाजप रस्त्यावर उतरेल असा इशाराही सरकारला दिला आहे. अनेक ठिकाणी पीक विमाचे पैसे भरून सुद्धा शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही ही बाब गंभीर असून या याबाबत त्वरित कार्यवाही करण्याची मागणी दरेकर यांनी केली.

कन्नड भागातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घराला भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी दरेकर यांनी केली. आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तसेच अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी शेतक-यांच्या घरांची पडझड झाली आहे.त्यांचेही त्वरित पंचनामे करुन त्यांना नुकसान भरपाई द्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले.

Image
राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त औरंगाबाद येथे त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण