छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध विषयांबाबत आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा

वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांशी निगडीत प्रलंबित प्रश्नासंदर्भात आज बैठक

छत्रपती संभाजीनगर,१९ जुलै  / प्रतिनिधी :- जिल्ह्यातील विविध विषयांबाबत गुरुवार दि.20 रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक होणार आहे. ही बैठक विधान भवनातील मुख्यमंत्री महोदयांच्या समिती कक्षात दुपारी तीन वा. होणार आहे. या बैठकीस राज्याचे रोहयो व फलोत्पादन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्यासह संबंधित विभागांचे प्रधान सचिव, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, मनपा आयुक्त जी. श्रीकांत आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.  

या बैठकीत स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक , संत ज्ञानेश्वर उद्यान ता. पैठण पुनर्विकास, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांचे वेरूळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारणी, अजिंठा लेणी विकास प्रकल्प,चिकलठाणा विमानतळ भूसंपादन मोबदला विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे, असे कळविण्यात आले आहे.

वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांशी निगडीत प्रलंबित प्रश्नासंदर्भात आज बैठक

वैजापूर,१९ जुलै /प्रतिनिधी :- गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वैजापूर तालुक्यातील देवगांव शनि उच्च पातळी बंधारा, चांदेश्वरी (हत्तीघोडा प्रकल्प), मन्याड साठवण तलाव  व रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना कर्जमुक्ती या शेतकऱ्यांशी निगडीत प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता.20) दुपारी मुंबई येथे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली असून आ.रमेश पाटील बोरणारे यांना या बैठकीस उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले आहे.

वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांशी निगडीत असलेले प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी आ.रमेश पाटील बोरणारे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव जाधव यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्री शिंदे यांनी या मागण्यांची दखल घेऊन या प्रश्नांसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीस आ.रमेश पाटील बोरणारे यांना बैठकीस उपस्थित राहण्याबाबत राज्याचे अवर सचिव अनिलकुमार उगले यांनी पत्राद्वारे कळविले आहे.