‘दोन पिढ्यांना जोडणारे, मार्गदर्शक नेतृत्व हरपले’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील- निलंगेकर यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. ५ : माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या विकास वाटचालीत योगदान देणारे, दोन पिढ्यांना जोडणारे मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात,  स्वातंत्र्यलढ्यात आणि महाराष्ट्राच्या उभारणीत योगदान देणाऱ्या नेतृत्वात ज्येष्ठ नेते निलंगेकर यांचा समावेश होता. बाणेदार आणि ठाम विचारसरणीचे नेते अशी त्यांची ओळख होती. मराठवाड्याच्या विकासाला गती देण्यासाठी नेहमी आग्रही असणाऱ्या शिवाजीराव पाटील यांनी तितक्याच तडफेने राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. निष्ठावंत राजकीय विचारसरणीच्या पाटील यांच्या निधनामुळे दोन पिढ्यांना जोडणारे मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे. ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

स्वातंत्र्यलढ्यात, महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देणारे नेतृत्व गमावलेउपमुख्यमंत्री अजित पवार

राज्याचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांच्या निधनाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देणारं महत्त्वाचं नेतृत्व आपण गमावले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचे नेतृत्व हे संघर्षातून निर्माण झालं होतं. जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी संघर्ष केला. सामाजिक, वैचारिक बांधिलकी जपणारे निष्ठावान नेतृत्व म्हणून ते सदैव स्मरणात राहतील. आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

माजी मुख्यमंत्री निलंगेकर यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले आहे. श्री.निलंगेकर हे सच्चे लोकनेते होते. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी शेतकरी व ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी वेचले. राज्य विधानमंडळाचे सदस्य म्हणून आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत तसेच मुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांनी राज्याच्या प्रगती आणि विकासात बहुमोल योगदान दिले. निलंगेकर यांचे राज्याप्रती योगदान तसेच त्यांची सामान्य जनतेप्रती बांधिलकी निरंतर लोकांच्या स्मरणात राहील, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या शोक संदेशामध्ये म्हटले आहे.

अनुभवी मार्गदर्शक, नेतृत्व गमावले! – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनामुळे अनुभवी मार्गदर्शक, नेतृत्व गमावल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

शिवाजीराव निलंगेकर यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना श्री.चव्हाण म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी ते कोरोनामुक्त झाल्याची बातमी वाचली तेव्हा अतिशय आनंद झाला होता. खंबीर, दृढनिश्चयी असलेले निलंगेकर साहेब पुन्हा लवकरच घरी परततील, अशी अपेक्षा होती. परंतु, दुर्दैवाने काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने राजकीय व सामाजिक क्षेत्रातील एक प्रदीर्घ पर्व संपुष्टात आले.

विद्यार्थी दशेतच त्यांनी हैदराबाद मुक्तीसंग्रामात उडी घेतली होती. स्वातंत्र्याचा लढा संपल्यानंतर त्यांनी स्वतःला लोकसेवेसाठी वाहून घेतले. आमदार ते मुख्यमंत्री या दीर्घ राजकीय प्रवासात त्यांनी नेहमी सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले. विशेषतः सिंचन क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. शिक्षण संस्था उभ्या करून लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात त्यांनी शिक्षणाची गंगा आणली.

अतिशय शिस्तप्रिय, वक्तशीर व चारित्र्यसंपन्न नेते म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांचा जनसंपर्क अतिशय दांडगा होता. गावागावातील कार्यकर्त्यांना ते नावानिशी ओळखायचे. नव्वदीत असतानाही ते अनेकदा काँग्रेस पक्षाच्या महत्वाच्या बैठकींना हजर रहायचे. आम्हाला मार्गदर्शन करायचे. पुढील काळात त्यांची उणीव आम्हाला नक्कीच जाणवत राहील, या शब्दात अशोक चव्हाण यांनी दिवंगत नेत्यास श्रद्धांजली अर्पण केली.

दूरदर्शी, शिस्तप्रिय व निष्ठावान नेतृत्व काळाच्या पडद्याआड – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनामुळे दूरदर्शी, शिस्तप्रिय व निष्ठावान नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. अशा शब्दात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना थोरात म्हणाले की, स्वातंत्र्य चळवळीत आणि मराठवाडा मुक्ती संग्रामात डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी सक्रीय सहभाग घेतला होता. ते यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांचे सहकारी होते. त्यांच्या सक्रिय राजकीय जीवनात महाराष्ट्राने विकासाचा कालखंड अनुभवला. महाराष्ट्राच्या परिवर्तनाला कारणीभूत ठरलेल्या श्वेतक्रांती आणि हरितक्रांती मध्ये त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. ते अभ्यासू आणि करारी स्वभावाचे होते. त्यांनी कायमच सत्यासाठी संघर्ष केला. 1985 ते 90 या माझ्या पहिल्या आमदारकीच्या काळात ते मुख्यमंत्री असताना त्यांच्याशी माझा जवळून संबंध आला. सामान्य माणसाचे जीवमान उंचावण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. महसूल मंत्री असताना महसूल विभागाला लोकाभिमुख करणारे अनेक निर्णय त्यांनी घेतले. मागास भागाच्या विकासासाठी ते आग्रही होते. विविध खात्याचे मंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे.त्यांच्या निधनाममुळे महाराष्ट्राच्या विकासाचा एक शिल्पकार आम्ही गमावला आहे.

सर्वसामान्य माणसांचा नेता हरपला – गृहमंत्री अनिल देशमुख यांची सहवेदना

राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनाने सर्वसामान्य माणसांचा नेता हरवला आहे, अशा शब्दात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सहवेदना व्यक्त केल्या आहेत.

शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी मराठवाड्यातील निलंगा तालुक्यातून काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता म्हणून राजकीय जीवनाला सुरूवात केली. आयुष्यभर काँग्रेस विचाराला जागले व सचोटीचे त्यांनी राजकारण केले. मराठवाड्यासारख्या भागातून आलेल्या निलंगेकरांनी आपल्या कर्तृत्वाच्या भरवशावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मिळविले. त्यांनी निलंगा तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली.

त्यांचा प्रामाणिकपणा, सचोटी व काँग्रेस पक्षाप्रती अढळ निष्ठा नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे, गृहमंत्री देशमुख यांनी शोक संदेशात म्हटले आहे.

माजी मुख्यमंत्री निलंगेकर यांच्या निधनामुळे कणखर, संघर्षशील नेतृत्व हरपले – मंत्री अमित विलासराव देशमुख

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष, हैदराबाद मुक्ती लढ्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आदरणीय डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनामुळे कणखर, संघर्षशील, लोकप्रिय नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात राज्याचे वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दुःख व्यक्त केले आहे.

आपल्या शोकसंदेशात मनातील भावना व्यक्त करताना पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे की, आपल्या सर्वांसाठी दादासाहेब म्हणून परिचित असलेले आदरणीय डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब हे एक कणखर, मुरब्बी, धुरंदर, अभ्यासू, लोकप्रिय असे व्यक्तिमत्त्व होते. नेहरू-गांधी घराण्याच्या विचारांशी एकनिष्ठ राहिलेल्या डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा जीवन प्रवास अगदी जन्मल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत संघर्षमय राहिला आहे. त्यांच्या एकूण कारकिर्दीचा उल्लेख करताना त्यांनी शून्यापासून सुरुवात करून विश्वाची निर्मिती केली होती असे म्हटले तरी ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही. समाजकारण आणि राजकारणात त्यांनी कमालीची झेप घेतली होती. निलंगा हे त्यांच्या कायम हृदयापाशी राहिले आहे, तेथून त्यांनी राजकारणाची सुरुवात केली आणि ते राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले.

महाराष्ट्र, मराठवाडा, लातूर जिल्हा आणि निलंग्याच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे, महाराष्ट्राच्या विधिमंडळाची उभारणी, औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची सुरुवात, विदर्भातील गोसीखुर्द प्रकल्प, आपणा सर्वांना परिचित असलेलले उजनी धरण, निम्न तेरणा प्रकल्प मसलगा धरण यासह त्याने केलेली अनेक  कामे आपणाला त्यांचे कायम स्मरण देत राहतील, खरेतर आदरणीय डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब, आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब, आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या नावाने लातूर जिल्ह्याची ओळख पटते, काँग्रेस पक्षाला उभारी देण्यात या तिन्ही नेत्यांचे योगदान, तपश्चर्या आणि श्रम मोलाचे ठरले आहे. डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांना मी लहानपणापासूनच पाहिले आणि ऐकले आहे, मी राजकारणात आल्यानंतर त्यांचा मला स्नेह आणि जवळून सहवास लाभला आहे. विधिमंडळात मी पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून गेलो तेव्हा तेही निलंगा मतदारसंघातून  आमदार म्हणून निवडून आलेले होते. त्यामुळे विधीमंडळात त्यांच्या समवेत एकत्रित काम करण्याचे सौभाग्य मला मिळालेले आहे. त्या काळातील त्यांच्यासोबतचे अनेक अनुभव माझ्या कायम स्मरणात राहतील, त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे होते ते मी शिकलो आहे. आज ते आपल्यातून निघून गेले आहेत त्यामुळे कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्याने निलंग्याने एक महामेरू, लातूरने महानायक आणि महाराष्ट्राने एक सच्चा काँग्रेसजन गमावला आहे… निलंगेकर कुटुंबाच्या या दुःखाच्या क्षणी आम्ही  संपूर्ण  देशमुख कुटुंबीय त्यांच्या समवेत आहोत. त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. निलंगेकर कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती प्रदान करावी, अशी ईश्वराकडे मी प्रार्थना करतो आहे. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांना पुनश्च एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आहे असेही त्यांनी या शोकसंदेशात म्हटले आहे.

एक संघर्षशील नेतृत्व हरपलं – शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. एक संघर्षशील व्यक्तिमत्त्व हरपलं. अशा शब्दात, शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *