वैजापूर शहरात प्रक्रिया न केलेल्या थंड पाण्याची जार मधून विक्री ; आर.ओ.प्लांट तपासण्याचे तहसीलदारांचे नगरपालिकेला आदेश

वैजापूर ,२० जून  /प्रतिनिधी :- पिण्याचे दर्जेदार  शुद्ध पाणी अशा जाहिरात बाजीच्या नावाखाली  कोणतीही प्रक्रिया न करता अशुद्ध पाणी थंड करुन नागरिकांना जार मधून विक्री करणा-या पाणी विक्रेत्याचे आर.ओ.प्लांटची तपासणी करण्याचे आदेश तहसीलदार राहुल गायकवाड यांनी  नगरपालिका प्रशासनाला दिले आहेत. तपासणीनंतर कारवाईसाठी अहवाल सादर करण्याचे स्पष्ट दिल्यामुळे जार मधून शहरभरात पाणी विक्रीचा नियमबाह्य धंदा मांडलेल्या विक्रेत्याचे धाबे दणाणले आहे. 

Apex Blue 20 Litre Water Jar, Rs 110/piece APEX TECHNOLOGY | ID: 13675198130

शहरातील श्रीराम काॅलनी परिसरातील रहिवासी सूरज कुमार तांबे यांनी तालुका प्रशासनाकडे शहरभरात जार मधून विक्री होणारे साधे पाणी विक्रेते थंड करुन ग्राहकांना शुध्द पाण्याच्या नावाखाली फसवणूक करुन त्यांच्याशी आरोग्याशी खेळत असल्याची लेखी तक्रार केली. पाणी विक्रीचा व्यवसाय सुरु केलेल्या मंडळीने आरोग्य विभाग तसेच नगरपलिका प्रशासनाची कोणतेही परवानगी न काढता नियमबाह्य पाणी विक्रीचा व्यवसाय सुरु केलेला आहे. पाण्याची गुणवत्ता नसल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना कविळ , अतिसार या साथ रोगाची बाधा होण्याची शक्यता असल्यामुळे या अवैध पाणी विक्रेत्यावर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती. तहसीलदार राहुल गायकवाड यांनी  या तक्रारीची गंभीर दखल घेऊन वैजापूर नगरपलिकेचे मुख्याधिकारी यांना शहर परिसरातील सर्व आर.ओ. प्लांटची तपासणी मोहीम राबवून त्याठिकाणी नियमानुसार पिण्याचे पाणी शुद्ध केले जाते की नाही याची पाहणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान शहर परिसरात नागरिकांनी पालिकेच्या नळ योजनेतून उपलब्ध होणारे पाणी साठयाचा इतर घरगुती वापरासाठी सुरु केल्यामुळे जारच्या पाण्यावर निम्म्या पेक्षा अधिक शहराची भिस्त सध्या अवलंबून आहे. बहुतांश भागातील रहिवासी कुंटुब तहान भागविण्यासाठी नगदी पैसे खर्च करुन जार चे पाणी खरेदी करतात.या खाजगी जलविक्री व्यवसायात दिवसाकाठी लाखोची उलाढाल पिण्याच्या पाणी विक्रीतून होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.स्वच्छ थंडगार गुणवतेच्या नावाखाली पाणी विक्रीचा व्यवसाय थाटलेल्या अनेक विक्रेते नागरिकांना पुरवठा करत असलेला पाणीसाठा आरोग्य हिताचा आहे का ? हा संशोधनाचा विषय झाला आहे. विशेषतः जार मधील पाण्यात खरोखर आरोग्यशील घटकांचा समावेश केलेला आहे की नाही यांची कोणतेही खातरजमा न करता नागरिक डोळेझाकपणाने पाणी गळ्याखाली उतरवत असल्याचे गंभीर चित्र आहे.अनेक ठिकाणी केवळ दिखाऊदार प्रतिष्ठासाठी जार संस्कृतीचे अनुकरण  केले जाते.
स्थानिक प्रशासनाचे पाणी विक्रीकडे दुर्लक्ष

शहरी भागात खाजगी जारद्वारे पाणी विक्री व्यवसाय करणा-या कडे स्थानिक प्रशासनाचे मोठे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. प्रशासकीय पातळीवर कोणताही परवाना किंवा जलशुद्धीकरणाचे प्रमाणपत्र नसताना गल्लोगल्ली जार विक्री व्यवसायिकांचे जाळे शहरभरात तयार झाले आहेत.परवानगीची आवश्यकता नसल्याच्या अविर्भावातून गल्लीबोळात, घरादारात बोअरवेल, नगरपालिकेच्या नळयोजनेतील पाण्यातून आर्थिक कमाई साधण्याचा धंदा येथे चांगलाच फोफावला आहे. नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून नळाद्वारे सोडलेले पाण्याचा वापर पिण्यासाठी टाळला जात असल्याची गंभीर बाब समोर आली. पाणी विक्रीचा व्यवसाय तेजीत सुरू आहे. तसेच पाणीटंचाईमुळे फेब्रुवारीपर्यंत 20 रुपयाला मिळणाऱ्या 20 लिटर जारची किंमत एप्रिलमध्ये 30 रुपयांपर्यंत गेली आहे. शहरात बीआयएसचा परवाना असलेले केवळ तीन व्यावसायिक आहेत. 

पाणी पुरवठा अभियत्यांकडे सोपवली जबाबदारी 

नगरपलिकेत पाणी पुरवठा विभागाचे अभियंता सुरेश चिमटे यांच्याकडे आर.ओ.प्लांन्ट तपासण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली.