मोदीजी कोणती डिटर्जंट पावडर वापरली? अजित पवारांच्या बंडावरुन एमआयएमचा मोदींना सवाल

छत्रपती संभाजीनगर,४ जुलै  / प्रतिनिधी :- राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांच्या पाठिंब्याने भाजपशी हातमिळवणी केली. तसंच रविवार (२ जुलै) रोजी राजभवन येथे उपमुख्यमंत्री पदाची तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतल्या आठ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यावरुन एमआयएम पक्षाकडून छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात आज (४ जुलै) रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलन करण्यात आलं.

या आंदोलनावेळी एमआयएमकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिंदे गटाच्या आमदारांच्या जुन्या भाषणाचे व्हिडिओ दाखवण्यात आले. ज्यामध्ये या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यावेळी खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपासह शिंदे गटावर हल्लाबोल केला. काही दिवसांपूर्वी तु्म्हाला भ्रष्ट वाटणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून कसे काय बसलात? असा प्रश्न देखील इम्तियाज जलील यांनी भाजपासह शिंदे गटासमोर उपस्थित केला. यावेळी त्यांनी ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणांच्या दबावाखाली स्थापन झालेल्या सरकारचे अभिनंदन करत व्यंगात्मक आंदोलन केलं.

यावेळी बोलताना इम्तियाज जलील म्हणाले की, हे आंदोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आहे. पाच दिवसांपूर्वी केलेल्या भाषणात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यात त्यांनी बँक घोटाळा, सिंचन घोटाळा, खणन घोटाळ्यांसह मोठी यादी असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या नेत्यासोबत मांडीला मांडी लावून बसताना मोदीजींनी कोणती डिटर्जंट पावडर वापरलीत ते सांगावं, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. तसंच सत्ता आल्यावर अजित पवारांना तुरुंगात पाठवून चक्की पिसायला लावणारे देवेंद्र फडणवीस आता त्यांच्या मांडीला मांडी लावून का बसला आहात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.