जनता-जर्नादनाला नमन; पीएम मोदी म्हणाले – ही 2024 ची हॅटट्रिक

नवी दिल्ली ,३ डिसेंबर  /प्रतिनिधी :-विधानसभा निवडणुकीच्या निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की जनता-जनार्दनाला नमन!. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड निवडणुकीच्या निकालांनी दाखवून दिले की भारताच्या जनतेचा विश्वास केवळ आणि केवळ सुशासन आणि विकासाच्या राजकारणात आहे. त्यांचा विश्वास भाजपवर आहे.

पंतप्रधान मोदी भाषणासाठी व्यासपीठावर येताच उपस्थितांमधून ‘भारत माता की जय’ आणि ‘मोदी मोदी’ अशा घोषणा सुरु होत्या. त्याच क्षणी मोदी म्हणाले की, ‘भारत माता की जय’ हा आवाज तेलंगणापर्यंत पोहोचला पाहिजे.

ते पुढे म्हणाले की, आजचा विजय ऐतिहासिक आणि अभुतपूर्व आहे. आज सबका साथ सबका विकासाची भावना जिंकली आहे. विकसीत भारताच्या आवाहनाचा आज विजय झाला आहे. आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेचा आज विजय झाला आहे. वंचितांच्या विजयाचा आज वियज झाला आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, भाजपवर आपला स्नेह, विश्वास आणि आशीर्वाद बरसण्यासाठी या सर्व राज्यांच्या कुटुंबियांचे खासकरून माता-भगिनी-मुलींचे, आमच्या तरूण मतदारांचे मनापासून आभार मानतो. मी त्यांना विश्वास देतो की आम्ही तुमच्या कल्याणासाठी निरंतर अथक परिश्रम करत राहू.

या निमित्ताने पक्षाच्या सर्व परिश्रमी कार्यकर्त्यांचे विशेष आभार! तुम्ही सर्वांनी अद्भुत उदाहरण सादर केले आहे. भाजपचा विकास आणि गरीब कल्याणकारी योजना ज्या पद्धतीने लोकांमध्ये पोहोचवल्या त्याचे कौतुक जितके केले जावे कमी. आम्ही विकसित भारताचे लक्ष्य घेऊन पुढे जात आहोत. आम्हाला थांबायचे नाहीये. तसेच थकायचेही नाही. आम्हाला भारताला विजयी बनवायचे आहे. आज या दिशेने आम्ही पुन्हा एकदा सशक्त पाऊल उचलले आहे.

हे आपल्या सर्वांचं सौभाग्य आहे की जेव्हा आपल्या कुटुंबियांकडून इतकं प्रेम मिळतं, विश्वास मिळतो. त्यामुळं माझी जबाबदारी अधिक वाढते हे मी व्यक्तीगतरित्या अनुभवतो आहे. आजही माझ्या मनात हाच भाव आहे. मी माझ्या माता- भगिनी, युवा साथींसमोर, शेतकरी भावा-बहिणींसमोर नतमस्तक आहे, असं मोदी म्हणाले.