शिवसेना कार्यकारिणीच्या बैठकीत ‘हे’ सहा ठराव मंजूर!

मुंबई : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत शिवसेना भवन येथे झालेल्या शिवसेना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत काही महत्वाचे ठराव आज मंजुर करण्यात आले. हे ठराव शिवसेनेच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहेत.

पहिला ठराव
शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी आजवर पक्षाच्या प्रगतीसाठी केलेले काम आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोरोना काळात केलेले उल्लेखनीय काम याबद्दल उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा ठराव बैठकीत मंजुर करण्यात आला. या ठरावावर सर्वांनी टाळ्या वाजवून आणि उद्धव ठाकरे यांचे कौतुक करत सर्वानुमते अनुमोदन देण्यात आले.

दुसरा ठराव
शिवसेना ही बाळासाहेबांची होती, आहे आणि राहील. इतर कुणीही स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरू शकत नाही. तसे केल्यास रितसर तक्रार आणि कारवाई करण्यासाठीची पावलं उचलली जातील, असा दुसरा ठराव संमत करण्यात आला.

तिसरा ठराव
शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे सर्वाधिकार हे राष्ट्रीय कार्यकारिणीने पक्ष प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांना देण्यात आला. हा ठराव खासदार संजय राऊत यांनी मांडला.

चौथा ठराव
बंडखोरांवर कारवाई करण्याचे सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांना दिले आहेत. या ठरावामुळे आता उद्धव ठाकरे यांच्याकडून आता बंडखोरांवर कारवाई करण्यात येणार आहे.

पाचवा ठराव
शिवसेनेने आपल्या ठरावात पुन्हा एकदा मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाशी प्रतारणा करणार नसल्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

सहावा ठराव
आगामी महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली प्रत्येक महानगरपालिकेवर भगवा फडविण्याच्या निर्धाराचा ठराव यावेळी संमत करण्यात आला.