उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारवर बारसुमधून थेट वार

आता उद्धव ठाकरेंचीही ‘भाकरी’

महाड , ६ मे  / प्रतिनिधी :-​ ​ रत्नागिरीतील राजापूर येथील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीवरून मोठा वाद सुरू आहे. या प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. आंदोलकांवर पोलिसांनी बळाचा वापर केल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. दरम्यान, आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजापूरमधील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. नारायण राणे यांनी दिलेल्या आव्हानावरही त्यांनी भाष्य केले.

“लोकांची डोकी फुटली तरी चालतील, कोकणची जनता भिकारी झाली तरी चालेल. मात्र, रिफायनरी बांधलीच पाहिजे, अशी शिंदे सरकारची भूमिका आहे. मात्र, बारसूच्या जनतेला रिफायनरी नको आहे. हुकूमशाहीने हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र पेटवू’, अशी टीका उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारवर केली आहे.

मी मुख्यमंत्री असताना टाटा एअरबस, बल्क ड्रग्ज पार्क असे अनेक प्रकल्प महाराष्ट्रात आणले. मात्र, हे सर्व प्रकल्प गुजरातमध्ये हलवण्यात आले आणि आता महाराष्ट्रावर वादग्रस्त प्रकल्प राबवले जात आहेत. हे सरकार आपल्याच लोकांचे नुकसान करून विकास करणार असेल तर असा विकास आम्हाला नको आहे, असे ते म्हणाले.

ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आज कोकणात बारसू दौऱ्यावर आहेत. इथ्या दोन गावांनी भेटी देत त्यांनी रिफायनरी प्रकल्पाला विरोध असणाऱ्या ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला. हा प्रकल्पा चांगला असता तर राज्यातले सर्व पोलीस इथं का आणले जातायत? ग्रामस्थांवर लाठ्या का बरसवल्या जात आहेत? जसं मी इथे आलो तसं त्या सूपारीबहाद्दरांनी इथं यावं आणि ग्रामस्थांसमोर प्रेझेंटेशन द्यावं, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.  पण लोकं विरोध करत असतील तर शिवसेना म्हणून मी विरोध करणार अशी ठाम भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. 

नाणार प्रकल्प होऊ नये त्या आंदोलनात शिवसेना ग्रामस्थांच्या पाठिशी उभी होती. प्रकल्प हवा असेल तर त्याचं स्वागत आहे. मी मुख्यमंत्री असातना आता जे सुपारी घेऊन गद्दार फिरतायत त्याच गद्दारांनी सांगितलं होतं की बारसूतल्या ग्रामस्थांचा विरोध नाही. बरीचशी जमीनही निर्मनुष्य आहे. पर्यावरणाची हानी कमी होईल, एक चांगला प्रकल्प आपल्या राज्याला मिळेल. अशी त्यांनी भूमिका मांडली होती. त्यानंतर मी एक पत्र केंद्राला पाठवलं. रिफायनरी इथे होऊ शकते की नाही याची चाचपणी करुन ग्रामस्थांनी संमती दिल्यानंतर मी इथेू येऊन इथल्या ग्रामस्थांना प्रेझेंटेनश दिलं असतं, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. 

माझ्या काळातील चांगले प्रकल्प पून्हा महाराष्ट्राला द्या?
आता मी दिलेल्या पत्राचं भांडवल केलं जात आहे पण, माझ्याच काळात वेदांत फॉक्सकॉन आणि एअरबस प्रकल्प गुजरातला का दिलात, चांगले प्रकल्प गुजरातला देण्यात आले. हा रिफायनरी प्रकल्प गुजरातला न्या आणि ते प्रकल्प पुन्हा महाराष्ट्राला द्या. चांगले प्रकल्प गुजरात आणि दिल्लीला दिले. विनाशकारी प्रकल्प महाराष्ट्राला दिले असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला. प्रकल्प चांगला असेल आणि गावकऱ्यांचा पाठिंबा असेल तर आम्ही मध्ये येण्याचं कारण नव्हतं. ज्या अर्थी दडपशाही सुरु आहे. त्याअर्थी या प्रकल्पात काहीतरी काळंबेरं आहे त्यानंतर राजन साळवी यांनीही प्रकल्पाला विरोध केला आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

ज्यांनी जमिनीत दलालीचा मलिदा खाल्ला आहे त्यांना परत पैसे द्यावे लागतील म्हणून हे आम्हाला विरोध करत आहेत असा आरोप करत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही टोला लगावला आहे. तुमच्या दौऱ्याला नारायण राणे यांनी विरोध केला आहे असा प्रश्न विचारल्यावर उद्धव ठाकरे यांनी राणे यांचा उल्लेख सुक्ष्म असा केला. 

शरद पवारांनंतर आता उद्धव ठाकरेंचीही ‘भाकरी’

शरद पवारांचं भाकरीचं वक्तव्य चर्चेत असतानाच त्यांनी आत्मचरित्रामधून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले, त्यावरूनही वाद निर्माण झाले.

शरद पवारांच्या टीकेवर उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होते, पण महाडमधल्या सभेत उद्धव ठाकरे यांनीही भाकरीचा उल्लेख केला. माझ्यावर टीका केल्यामुळे काहींना भाकरी मिळतेय, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. मला मुख्यमंत्री करण्यासाठी काय केलं? कसं सरकार चालवलं, हे मला कुठे लिहिण्याची गरज नाही, असा निशाणाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

बारसू प्रकल्पावरूनही उद्धव ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला आहे. मी प्रकल्प होऊन देणारच नाही, संपूर्ण महाराष्ट्र बारसूमध्ये उतरवेन. सगळं लपवून का करताय? मातीची चाचणी करायची असेल तर मातीतल्या लोकांच्या मनाचीही चाचणी करा. लोकांना विश्वासात का घेतलं जात नाही? उद्या रिफायनरी आल्यानंतर माझ्या कोकणातल्या बांधवांना कटोरे घेऊन फिरवणार का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

बारसूमध्ये सगळे जागा मालक उपरे आहेत. होय मी पत्र दिलंस, मी खोटं बोलत नाहीये. नाणारची रिफायनरी मी होऊ दिली नाही, पण मला दिल्लीतून फोन यायचे आणि हे गद्दार मला सांगायचे, साहेब मोठा प्रकल्प आहे. मला फसवून पत्र घेतलं गेलं, तिकडे गाव नाही, असं मला सांगितलं. सगळा सिक्वेन्स लागल्यावर मला कळालं, माझं पत्र घेतलं आणि हे गद्दार गेले, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.

बारसूमध्ये सर्वत्र पोलीस उतरवले आहेत. एवढा मोठा पोलीस बंदोबस्त चीनविरोधात लावा. केंद्रातील नेभळट त्यांच्यावर काहीच बोलत नाहीये. इकडे माझ्या लोकांवर लाठ्या चालवत आहेत. मी पोलिसांशिवाय जनतेमध्ये उभा राहू शकतो, तर हे का नाही उभं राहून सांगत प्रकल्प चांगला आहे. जमिनी उपऱ्यांच्या घशात घातल्या, कोकणच्या भूमीवर उपऱ्यांचा वरवंटा का चालवताय? अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला लक्ष्य 

शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाडमध्ये झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला लक्ष्य केलं आहे. निवडणुकीत जनतेची मते मांडायला हवीत. पण, हे ‘मन की बात’ करतात. २०१४ साली दिलेली आश्वासन विचारली की तुरुंगात टाकायचे. जातीय दंगली घडावायच्या, असा आरोप उद्धव ठाकरेंनी भाजपावर केला आहे.

“आज पंतप्रधान मतदारांना ‘बजरंग बली की जय’ म्हणा सांगतात. मग तुमचे बळ आणि ५६ इंचाची छाती कुठे आहे? त्यामुळे यापुढील प्रत्येक निवडणुकीत ‘जय भवानी जय शिवाजी’ म्हणत भाजपाला तडीपार करा,” असं आवाहन उद्धव ठाकरेंनी जनतेला केलं आहे.

“उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं म्हणून शिवसेनून बाहेर पडलो, अशी बोंब ठोकली जाते. पण, काय हिंदुत्व सोडलं? मी तर प्रत्येक सभेत विचारतो. एक गोष्ट सांगा मी हिंदुत्व सोडल्याची? हिंदुत्व काय आहे, हे समजून घ्या… आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाही. अनेकदा बाळासाहेबांनी सांगितलंय, ‘मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय, मला अतिरेकी आणि देशद्रोह्यांना बडवणारा हिंदू पाहिजे,’” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

“भाजपाचे हिंदुत्व काय आहे? मेहबूबा मुफ्तींबरोबर गेलात, तेव्हा तुम्ही काय सोडलं होतं? मोहन भागवत मशिदीत गेल्यावर मी काही बोललो का? मात्र, आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. भाजपाची भ्रष्टाचार आणि हिंदुत्वावर बोलण्याची लायकी नाही,” असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला आहे.

उद्धव ठाकरेंची नारायण राणेंवर मिश्कील टिप्पणी

उद्धव ठाकरेंनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लक्ष्य केलं आहे. सुक्ष्म माणसावर मोठी जबाबदारी आली आहे. त्यामुळे रोज वाट्टेल ते बोलतात. कारण, त्यावर त्यांचं पोट चालते, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

“काँग्रेस तुम्हाला रोज किती शिव्या देते, त्या तुम्ही मोजता. पण, भोक पडलेली तिनपाट लोक, हे रोज माझ्यावर बोलत आहेत. विनायक राऊत सांगत होते, आमच्याकडं एक आणि त्यावर दोन फ्री असणाऱ्यांची एवढी पंचायत झाली की, त्यांना काय सांभाळावे कळत नाही. दोन पोर सांभाळायला गेलं, तर डोक्यावरी टोप खाली पडते. टोप सांभाळायला गेलं, तर पोर सुटतात,” अशी खिल्ली उद्धव ठाकरेंनी राणेंची अप्रत्यक्षपणे उडवली आहे.