युवकांनी तंत्रज्ञान क्षेत्रात झेप घेऊन राष्ट्रविकास साधावा – डॉ. प्रवीण मेहता

स्वारातीम ‘राष्ट्रचेतना-२०२२’ आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवाचे थाटात उदघाटन

कोणतेही तंत्रज्ञान हे राष्ट्राच्या उन्नतीसाठी सन्मानासाठी महत्त्वाचे असते. ज्या राष्ट्राचे सरंक्षण तंत्रज्ञान प्रगत असतो तो देश जगात बलाढ्य देश म्हणून नावलौकिक कमावतो. युवकांनी तंत्रज्ञान क्षेत्रात झेप घेत राष्ट्रविकासासाठी पुढे यावे, असे प्रतिपादन डी.आर.डी.ओ. माजी महासंचालक डॉ. प्रवीण मेहता यांनी केले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅंपस, विष्णुपुरी, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने “राष्ट्राचेतना – २०२२” या आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.


यावेळी व्यासपीठावर कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरु डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, ज्येष्ठ अभिनेत्री सुप्रिया पठारे, सिने अभिनेता आदिनाथ ठाकरे, प्रसिद्ध नृत्यांगना सुधा कांकरिया, आर्ट ऑफ लिव्हिंगचे मकरंद जाधव, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचाकल डॉ. सूर्यप्रकाश जाधव, स्वागताध्यक्ष संजय पवार, डॉ. विजय पवार, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एल. एम. वाघमारे, मानव्य विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अजय टेंगसे, नवउपक्रम व नवसंशोधन साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. राजाराम माने, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मलिकार्जुन करजगी, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांची उपस्थित होते.


यावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पठारे यांनी युवकांनी आपले ध्येय निश्चित करतांना राष्ट्र उभारणीसाठीही योगदान गरजेचे असून आजचा युवक हा उद्याच्या संपन्न राष्ट्राचा निर्माता असल्याचे त्या म्हणाल्या.

प्रसिद्ध अभिनेता आदिनाथ कोठारे युवकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, नांदेडशी माझे नाते हे कायमचे राहणार आहे, नांदेडकरणांनी मला भरभरवून प्रेम दिले, त्यामुळे मी “पाणी” चित्रपट निर्माण करू शकलो. प्रेमानी कुठलीही गोष्ट साध्य करता येते. जग ही जिंकता येते,या असेही यावेळी म्हणाले. 


अध्यक्षीय भाषणात कुलगुरु डॉ. उद्धव भोसले म्हणाले की, युवक महोत्सवातून अनेक कलावंत घडत असतात. आज घडीला चित्रपट, टी. व्ही. सीरियलमध्ये युवकांना संधी मिळत आहे. युवकांनी विद्यार्थी दशेत सामाजिक बांधिलकी, राष्ट्रप्रेम, सामाजिक जाण ठेवणे गरजेचे असल्याचे म्हणले.

युवक महोत्सव हा विद्यार्थी कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने सुरु झाला आहे. सूत्रसंचालन डॉ. विश्वधार देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. ओमप्रकाश दरक यांनी मानले. .