राज ठाकरेंचा शरद पवारांवर निशाणा;बारसू मध्ये प्रकल्प होणार नाही 

मुंबईचा महापौर बंगला लोकांना विचारून ढापला का? राज ठाकरेंचा उद्धववर घणाघात

कोकण वाचवा… राज ठाकरे यांचा बारसू प्रकल्पाला विरोधी सूर!

रत्नागिरी, ६ मे  / प्रतिनिधी :-​ ​मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रत्नागिरीमध्ये सभा झाली. या सभेमध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या बारसू रिफायनरीबद्दलच्या भूमिकेवर घणाघाती टीका केली. स्थानिकांना बारसू प्रकल्प हवा असेल तर त्याला पाठिंबा देऊ असं म्हणता, मग मुंबईता महापौर बंगला लोकांना विचारून ढापला का? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला.

‘पक्ष म्हणून तुमची भूमिका काय? पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष आज येऊन गेले. जी लोकांची भावना असेल तीच आमची भावना, असं आता सांगत आहेत. अरे वा, मग तुम्हाला हवा होता म्हणून बाळासाहेबांच्या नावावरती मुंबईच्या महापौरांचा बंगला ढापला, तो लोकांना विचारून ढापला का?’ असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला.

आता तुमच्यासमोर तुमची भावना म्हणून येत आहेत, पण तुमच्या भावनेला काय अर्थ आहे? लोक तुम्हाला निवडून देतात तेव्हा तुम्ही लोकांचं हित बघितलंच पाहिजे. जनतेचं हित कशात आहे, त्यांना चार पैसे जास्त कसे मिळतील, याची काळजी सरकारने घ्यायची असते आणि सरकार काय सांगतंय त्यांची भावना तीच आमची भावना. हे सगळे जण तुम्हाला मूर्ख बनवत आहेत, फसवत आहेत, असा आरोप राज ठाकरेंनी केला.

‘सगळ्यांचे काही ना काही व्यापाऱ्याचे हेतू आहेत. या सगळ्यातून कोकण वाचवा, ही विनंती करण्यासाठी मी इथे आलो आहे,’ असंही राज ठाकरे म्हणाले.

प्रकल्प होणार नाही

बारसू मध्ये युनेस्कोला कातळशिल्प सापडली आहेत. युनेस्को जगभरातील अनेक हेरिटेज वास्तूंच जतन करते. आता आपल्याकडे कातळशिल्प सापडली आहेत. त्यामुळे अशा हेरिटेज वास्तूच्या आसपास कोणताही मोठा प्रकल्प किंवा युनेस्कोच्या परवानगीशिवाय मोठं बांधकाम करता येत नाही. कातळशिल्पांच्या आसपास 3 किलोमीटरपर्यंत कुठलाही विकास प्रकल्प करता येणार नाही. बारसूच्या रिफायनरी साईटच्या परिसरांत कातळशिल्प आहेत, म्हणजे इथे रिफायनरी होऊच शकत नाही. त्यामुळे माझी कोकणातील बांधवाना विनंती आहे की तुम्ही ह्यापुढे जमीन विकू नका, असं आवाहन राज ठाकरे यांनी कोकण वासियांना केलं आहे.

‘शिवछत्रपतींचं नाव घेत नाहीत, तेच…’, राज ठाकरेंचा शरद पवारांवर निशाणा

या सभेतून राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. तसंच शरद पवारांवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या नाराजीनाट्यावरही राज ठाकरे यांनी खास त्यांच्याच शैलीमध्ये टोलेबाजी केली. अरबी समुद्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरून राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केले.

‘काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार असताना कोणाच्यातरी डोक्यात खूळ आलं, अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बनवायचं. मी काय बोललो ते राहिलं बाजूला, राष्ट्रवादीच्या लोकांनी पसरवायला सुरूवात केली की राज ठाकरेंचा शिवछत्रपतींच्या स्मारकाला विरोध आहे. परवाच्या दिवशी राजीनामा दिलेल्या आणि आता असलेला अध्यक्ष, या माणसाच्या तोंडातून कधी शिवछत्रपतींचं नाव यायचं नाही, सगळी भाषणं काढून बघा त्यांची. शाहू, फुले, आंबेडकर मोठे होतेच, पण सर्वप्रथम शिवछत्रपतींचं नाव घेतलं पाहिजे. आमची ओळख शिवछत्रपतींची ओळख आहे. त्या महापुरुषाचं नाव आजपर्यंत कधी घेत नाहीत, घेत नव्हते त्यांनी राज ठाकरे शिवछत्रपतींच्या पुतळ्याला विरोध करतोय हे पसरवायला सुरूवात केली,’ असा घणाघात राज ठाकरेंनी केला.

अजितदादांवर टोलेबाजी

दुसरीकडे शरद पवारांनी अजित पवारांमुळेच राजीनामा मागे घेतल्याचं विधान केलं. ‘राजीनाम्याचा गोंधळ सुरू होता तो काल संपला. त्यांना खरच राजीनामा द्यायचा होता, असं मला खरंच वाटतं. पण राजीनामा दिल्यानंतर अजित पवार ज्या प्रकारे वागले आहेत. हे तू गप्प बसं, ए तू शांत बस, तू माईक हातातून घे. हे सगळं होत असताना पवार साहेबांच्या मनात आलं असणार, मी आता राजीनामा दिलाय, हा माणूस असा वागतोय, खरंच दिला तर उद्या मला पण गप्प बस सांगेल. त्या भीतीपोटी शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला. आता असं वागतायत, पुढे कसं वागतील, भानगड नको, म्हणून त्यांनी राजीनामा मागे घेतला,’ असा टोला राज ठाकरेंनी लगावला.

‘काय चालू होतं, काही पोच नाही. जवळपास आतून उकळ्या फूटत होत्या, होतंय ते बरं होतं. माझ्या मुलाखतीमध्ये मी काकांकडे लक्ष द्या, हे सांगितलं होतं. ते कधी कोणती गोष्ट करतील ते सांगता येत नाही. तो त्यांच्या पक्षातला विषय आहे, आपल्याला त्याच्यामध्ये काही देणं घेणं नाही,’ असं राज ठाकरे म्हणाले.