वचनबद्धता आणि सातत्यपूर्ण दक्षतेमुळे देशाला सुरक्षिततेची हमी मिळते- राजनाथ सिंह यांची सैनिकांना ग्वाही

संरक्षणमंत्र्यांनी जम्मू काश्मीरमधील राजौरी बेस कॅम्पला दिली भेट

राजौरी ,६ मे  / प्रतिनिधी :- संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज जम्मू काश्मीरमधील राजौरी बेस कॅम्पला  भेट दिली आणि सीमेवरील संरक्षण सज्जता आणि सुरक्षाविषयक स्थितीचा आढावा घेतला. जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि नॉर्दर्न कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी, या आढावा बैठकीला उपस्थित होते.

संरक्षणमंत्र्यांनी या ठिकाणी तैनात असलेल्या सैनिकांसोबत संवाद साधला आणि आव्हानात्मक परिस्थितीत काम करताना दाखवण्यात येणारे अतुलनीय शौर्य आणि जोश याबद्दल त्यांची प्रशंसा केली.

अतिशय दुर्गम भागात भारतीय लष्कराचे धाडस, वचनबद्धता आणि सातत्यपूर्ण दक्षता यामुळे देशाला सुरक्षिततेची हमी मिळते, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. याच समर्पित वृत्तीने आणि धाडसाने आपले काम सुरू ठेवण्यासाठी त्यांनी सैनिकांना प्रोत्साहन दिले तसेच सरकार आणि देशातील जनता नेहमीच संरक्षण दलांसोबत असल्याची ग्वाही दिली. देशसेवा करताना धारातीर्थी पडलेल्या शूर जवानांना राजनाथ सिंह यांनी राजौरी येथे 5 मे 2023 रोजी आदरांजली वाहिली. या जवानांचे हौतात्म्य कधीही विसरता येणार नाही, असे ते म्हणाले.