शिऊर परिसरात सौर प्लेट चोरणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात ; आठ लाख 74 हजाराचा मुद्देमाल हस्तगत

वैजापूर ,​७​ मे  / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील शिऊर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासुन सौर प्लेट चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. या घटनांचा छडा लावण्यात शिऊर पोलिसांना यश आले.

पोलिस अधीक्षक ​ मनीष कलवानिया, अप्पर पोलिस अधीक्षक ​ सुनिल लांजेवार व सहायक पोलिस अधीक्षक ​ महक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली शिऊर पोलिस ठाण्याचे एपीआय संदिप पाटील यांच्या पथकाने चार जणांना अटक केली आहे. लक्ष्मण भास्कर निकम (35, रा. अंचलगाव), रामकृष्ण दत्तु पवार (32, छत्रपती संभाजीनगर), उद्धव प्रकाश भिवसने (रा.बाबरा, रा. फुलंब्री) व गणेश राजपूत (रा.छत्रपती संभाजीनगर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडुन पोलिसांनी तीन लाख 14 हजार रुपये किमतीच्या 37 सौर प्लेटा, गुन्ह्यात वापरलेले वाहन, दोन दुचाक्या असा सुमारे आठ लाख 74 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

कन्नड तालुक्यातील निपाणी येथील गणेश निकम व शिऊर येथील बबन जाधव यांनी सौर प्लेट चोरी गेल्याची तक्रार दिल्यानंतर शिऊर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक अंकुश नागटिळक, योगेश पवार, सहायक पोलिस उपनिरीक्षक भिकन शेख, तिलोकचंद पवार, रामचंद्र जाधव, विशाल पडळकर, सविता वरपे, सिंधु शिकेतोड, विशाल पैठणकर, संभाजी आंधळे, गणेश जाधव, श्रद्धा शेळके यांच्या पथकाने मोठ्या शिताफीने आरोपींना गजाआड केले.