छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेशात भाजपाचा  झेंडा! काँग्रेसचा पराभव

नवी दिल्ली ,३ डिसेंबर  /प्रतिनिधी :-चार राज्यातील निवडणुकांचे निकाल झाले आहेत. सायंकाळपर्यंत हाती आलेल्या निकालानुसार कांग्रेसने आपल्या हक्काच्या राजस्थान आणि छत्तीसगड या दोन राज्यातील सत्ता गमावली आहे. भाजपने मात्र आपला मध्यप्रदेश हा गड राखत काँग्रेसकडून राजस्थान आणि छत्तीसगड पण हिसकावून घेतले आहेत. तेलंगणात मात्र काँग्रेसने भारत राष्ट्र समितीचे केसीआर यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल केली आहे. मतदान पार पडलेले मिझोराम या राज्याचे निकाल सोमवार ४ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत.

आज निकाल जाहिर झालेल्या चार ज्यांपैकी तीन राज्यात भाजपने सरकार स्थापन केल्यानंतर भाजप देशातील १२ राज्यांमध्ये स्वबळावर सत्तेत असणार आहे. तर, काँग्रेस मात्र देशातील फक्त तीन राज्यात स्वबळावर सत्तेत असणार आहे. कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशात काँग्रेसने पूर्ण बहुमतात सरकार स्थापन केलं आहे. तर आता त्यात तेलंगणाची भर पडणार असल्याचं चित्र आहे.

या राज्यात भाजप सत्तेत

केंद्रात पाशवी बहुमतात सत्तेत आलेली भाजपा उत्तराखंड, हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात, गोवा, आसाम, त्रिपुरा, मणिपूर, अरुणाचल प्रदेशमध्ये सत्तेत असून मध्य प्रदेशात देखील भाजपा आपली सत्ता कायम राखणार असल्याचं जवळ जवळ स्पष्ट झालं आहे. या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेसची राजस्थान आणि छत्तीसगड ही दोन राज्य देखील आपल्या गोटात  सामिल केली आहेत. असं असलं तरी हरियाणा राज्यात भाजपची जननायक जनता पक्षाशी युती आहे. तर महाराष्ट्र, मेघालय, नागालँड आणि सिक्कीम या चार राज्यात भाजप सत्तेत सहभागी आहे.

काँग्रेस किती राज्यात सत्तेत ?

देशात एकेकाळी बलशाली असलेल्या काँग्रेसचे मात्र खूप कमी अस्तित्व उरल्याचं दिसू येत आहे. कर्नाटक, हिमाचल आणि आता तेलंगणा अशा तीन राज्यांत काँग्रेस स्वबळावर सत्तेत आहे. आपल्या प्रतिस्पर्धी बीआरएस पक्षाला काँग्रेस चांगलाच धोबीपछाड दिल्याचं दिसत आहे. यासोबत काँग्रेस बिहार आणि झारखंडमधील सत्ताधारी आघाडीचा देखील एक भाग आहे. तामिळनाडूत द्रविड मुन्नेत्र कळघम सोबत काँग्रेसची युती आहे. मात्र काँग्रेस याठिकाणी सत्तेत सहभागी झालेला नाही.