महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’! “मग पदवीचा उपयोग काय…”, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला

महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’!

उद्धव ठाकरेंनी भरसभेत अदाणींचं नाव घेत पंतप्रधानांवर केला हल्लाबोल

छत्रपती संभाजीनगर,२  एप्रिल / प्रतिनिधी :-  महाविकास आघाडीने छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘वज्रमूठ’ सभा घेतली. यावेळी सर्वांच्या नजर होत्या त्या उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली.  मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर पार पडलेल्या या सभेला विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि महाविकास आघाडीचे अन्य नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.

“आम्ही घटनेचे रक्षण करणार आहोत. घटना पायदळी तुडवणाऱ्यांना पायाने तुडवल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. ते म्हणाले, भाजप न्यायव्यवस्थेवर नियंत्रण मिळवू पाहत असून न्यायवृंदामध्ये आपली माणसे घुसवायला मागत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची नेमणूक करताना आमचे ऐकलेच पाहिजे, असे यांचे म्हणणे आहे. ज्या दिवशी न्यायालय यांच्या बुडाखाली जाईल, त्या दिवशी देशात आपल्याला लोकशाहीला श्रद्धांजली वाहावी लागेल” अशी टीका यावेळी त्यांनी केली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, “महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा केंद्राने एक मालकधार्जिणा कायदा आणण्याचा प्रयत्न केला. आम्ही तो महाराष्ट्रात लागू होऊ दिला नाही. पण आता हे मिंधे सरकार राज्यात तो कायदा लागू करू बघत आहे,” असा दावा त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, “तुम्हाला दुसरा पक्षच शिल्लक ठेवायचा नाही. देशात एक विधान, एक निशाण असे तुम्हाला राबवायचे आहे. देशाची अध्यक्षीय हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे.” अशी टीका त्यांनी यावेळी केली.

“अमित शाह म्हणाले होते की शिवसेनेला जमीन दाखवायची. मी म्हटले मला जमीन बघायचीच आहे. जमीन दाखवायची असेल, तर पाकव्याप्त काश्मीरची एक इंचतरी जमीन जिंकून दाखवा, मग आम्ही तुम्हाला मानू. नाहीतर पुचाट लेकाचे, हिंदुत्वाच्या गप्पा करू नका.” अशी टीका त्यांनी गृहमंत्री अमित शहांवर टीका केली. तसेच, मी माझ्या वडिलांचे नाव सोडणार नाही. हिंमत असेल, तर तुम्ही पंतप्रधान मोदींना घेऊन महाराष्ट्रात या, मी माझ्या वडिलांचे नाव घेऊन महाराष्ट्राच्या मैदानात येतो.” असे पुन्हा एकदा त्यांनी शिंदे गट आणि भाजपला दिले.

केंद्रात शेतकरी कायदा आणल्यावर उत्तरेतील शेतकरी रस्त्यावर आले होते. अद्यापही लोकशाहीतील दम गेलेला नाही. शिवसेना प्रमुखांनी जय जवान, जय किसान, जय कामगार हा नारा दिला होता. तुमच्या कष्टावर आणि घामावर देश उभा आहे. तुम्ही म्हणाल, तर आम्ही राज्यकर्ते आहोत. राज्यकर्त्यांनी देशाला आणि राज्याला दिशा देण्याचं काम करायला हवं. पण, ती दिशा चुकून दुर्दशेकडे जात असेल, तर आम्हाला तुम्हाला घरी पाठवण्याचं काम करावं लागेल, असा इशारा शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारला दिला आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख श्री उध्दव ठाकरे यांचे संबोधन

इथे अनेकदा आलो, गेल्या वर्षी आलो तेव्हा मुख्यमंत्री होतो, प्रत्येकवेळी गर्दीचा महापूर. आज अभिमानाने आणि समाधानाने आलो. १९८८ साली याच शहराने शिवसेनेच्या ताब्यात मनपा दिली. शिवसेनाप्रमुखांनी दंडवत घालून छ. संभाजीनगर हे नाव करणार असे वचन दिले. दोन वेळा केंद्रात आणि राज्यात आपण भाजप सोबत होतो पण छ. संभाजीनगर केले नाही ते काम मविआने करुन दाखवले. यावरून त्यांची वृत्ती दिसते. करत काहीच नाही कोंबड्या झुंजवायच्या जातीय तेढ निर्माण करायची.

सावरकर गौरव यात्रा जरुर काढा आता हिंदू जनाक्रोश मोर्चा शिवसेनाभवनाकडे आणला. या देशाचा पंतप्रधान शक्तीमान असूनही तुम्हाला हिंदू जन आक्रोश यात्रा का काढवी लागते. मालेगावात सभा झाली. माझ्यावर हिंदुत्व सोडल्याचा आरोप. मला एक उदाहरण द्या मी पुन्हा तोंड दाखवणार नाही. घटनेची शपथ घेतल्यावर जातीय तेढ निर्माण करतात. मी काँग्रेस सोबत गेलो तर हिंदुत्व सोडले असेल तर मुफ्ती मोहम्मद सोबत गेल्यावर तुम्ही काय सोडले. तुम्ही म्हणाल तेच खर ही मस्ती संपविण्यासाठी मविआची वज्रमूठ. अनेक युवक युवतींनी पदवी मिळवली आहे हल्ली डाॅक्टरेट पण विकत घेता येते. पण पदवी दाखवून पण किंमत नाही, पण पंतप्रधानांची पदवी मागितली तर दंड होतो. कुठली पदवी आहे, महाविद्यालयाला पण पंतप्रधान आपले असल्याचा अभिमान वाटायला हवा. पंतप्रधान जिथे शिकले त्यांना अभिमान वाटायला हवा.

मविआ सरकार तुम्हाला पसंत होत का? (प्रचंड प्रतिसाद). तिघे एकत्र आले पण सत्ता गेल्यावर पण आम्ही घट्टपणे एकत्रच आहोत. अमित शहा आरोप करुन गेले, मी विचारतो अमित शहांना मी बाळासाहेबांची भाषा बोलू शकतो मग भाजप मिंधेंचे काय चाटतय. चांगली चाललेली सरकारे पाडायची मग तेव्हा तुम्ही नितिश कुमारांचे काय चाटत होतात? मोदी म्हणतात त्यांची प्रतिमा खराब करतायत. मग आमची प्रतिमा नाही का? तुमचा अपमान म्हणजे ओबीसींचा अपमान? विरोधी पक्षातील लोकांना त्रास दिला जातोय. तुम्ही मेघालयात संगमावर भष्टाचाराचे आरोप केले होते आता तुम्ही संगमांचे काय चाटताय?

भ्रष्ट दिसला की घे पक्षात सगळे भ्रष्ट तुमच्या पक्षात मग हा भारतीयांचा अपमान आहे. भ्रष्टाचारी पक्ष म्हणून नाव ठेवा. आता भाजपच्या व्यासपीठावर सगळे संधी साधू. तुमचे हिंदुत्व आम्ही मानायला तयार नाही. लोकशाही संपवायची इतरांना ठेवायचे, तुरूंगात टाकायचे. सावरकरांचे स्वप्न अखंड हिंदुस्थानात त्यांच्यात हिंमत आहे भाजपची. आम्ही जमिनीवरचे माणसं पाकव्याप्त जमीन मिळून दाखवा. सरदार सरोवर बांधले मराठवाडा वल्लभभाई पटेलांमुळे. नुसत पोलाद जमा केले पण तुमच्या रक्तात ते उतरले असेल तर पाकव्याप्त मिळून दाखवा.

इस्रायलचे उदाहरण. वाळवंटात शेती. आपल्या देशात न्याय व्यवस्था बुडाखाली घेण्यासाठी भाजपची वाटचाल. ज्या दिवशी न्याय यांच्या बुडाखाली जाईल त्यादिवशी लोकशाही संपेल. नेतान्याहू मोदींचे मित्र. नेतान्याहूने प्रयत्न केला लाखो नागरिक रस्त्यावर उतरले. पोलीस प्रमुख संपावर गेले. लोकांच्या रेट्यामुळे नेतान्याहूना कायदा परत घेतला ही लोकशाही. तुमच्या मागे आम्ही येणार नाही. जनता मत देते मग जनतेला पंतप्रधानांवर वचक ठेवावा लागेल. आम्ही संविधानाचे रक्षण करणार ती ताकद आपल्यात आहे.

मविआ काळात केंद्र सरकारने मालक धार्जिणा कायदा आणला तो आपण महाराष्ट्रात लागू होऊ दिला नाही आता मिंधे तो लागू करण्याचा प्रयत्नात. कामगारांच्या कष्टावर देश उभा आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे सांगतात दिवाळी काळात गंगापूरला आलो होतो. अवकाळी पाऊस झाला. आपण बीड पॅटर्न आणण्याचा प्रयत्न करत होतो. शेतकऱ्यांची थट्टा हे सरकार करतय. विम्याचे पैसे मिळत नाही. मविआ काळात जे बोललो ते केले. पीक कर्जमुक्ती मविआ आल्यावर केली. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार आता मिळत नाही. मी कोरोना काळात जे घरात बसून केले ते तुम्ही सुरत गुवाहटीला जाऊन करु शकला नाहीत. मालेगावात कांदा उत्पादक शेतकरी. एका कांद्याला ५० खोके दिलेत पण शेतकऱ्यांना काहीच नाही.

संकट येते तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी मदत केली. भाजपची पालखी व्हायला शिवसेनेचा जन्म नाही तो भूमीपुत्रांसाठी. आता आहे कोण भाजप सोबत. आपले नाव, चिन्ह आणि वडील चोरायचा प्रयत्न. यांचे वडील म्हणत असतील काय दिवट कार्ट यांना बाप पण दुसरे लागतात. या मोदींना घेऊन या मी माझ्या वडिलांचे नाव घेऊन येतो. मला जनतेचे आशीर्वाद ते तुम्ही चोरु शकत नाही. इतरांचे विचार तुमचे वाचू का? म्हणून विचारता पण जनता मतदानाला उतरेल तेव्हा तुम्ही वाचणार नाही.

काय दिल यांनी? शेतकऱ्यांना हमीभाव नाही, नौकरी नाही. कोरोना काळात सगळेजण राजेश टोपेंचा उल्लेख. आताचे आरोग्यमंत्री … जाऊ द्या. हिडेनबर्गच्या अहवालावरून राहुल गांधींना शिक्षा. तुम्हाला का प्रश्न विचारायचे नाही? अनिल देशमुखांच्या ६ वर्ष नातीची चौकशी हे कसले हिंदुत्व? कशाला महाराजांचे नाव घेता. एक गद्दार सुप्रियाताईंना बोलतो, एक गद्दार सुषमाताईंना बोलतो हे असले गद्दार. मत पटत नसेल तर मतावर बोल पण महिलांना शिव्या देणे हे मी कधी सहन केले नसते. भगवा तुमच्या हातात शोभत नाही. नुसती सत्ता हवी. मी मुख्यमंत्री होईल हे वचन मी शिवसेनाप्रमुखांना दिले नव्हते. मी अमित शहांना सांगितले होते पण नाही ऐकल मग काय झाल मनावर दगड ठेवून बसलात. मिंध्याचे ओझे घेवून तुम्ही नेतृत्वात निवडणुका लढवणार आहात का? आता बघा ही जनता कशी घाव घालते भाजप नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही. देण्याची वृत्ती तुमचात नाही मोठी करणारी माणसं आजही माझ्या सोबतच. आपली दैवत आपल्याकडे बघताहेत. भाजप मधील सावरकर भक्तांना सांगतो सावरकरांनी जे कष्ट भोगले ते मोदींना पंतप्रधान करण्यासाठी नाही.

सगळे विषय भरकटवून टाकायचे. केजरीवाल जे बोलतायत त्यावर उत्तर नाही आणि हे आम्हाला विचारतात. आम्हाला शिकवायला जाऊ नका. आमच हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे नाही ते राष्ट्रीयत्व आहे. कश्मीरातील सैनिक औरंगजेब जो देशासाठी लढला तो औरंगजेब त्याला अतिरेक्यांनी मारला तो देशासाठी शहीद झाला तो आपला. अश्फाकुल्ला खान क्रांतिकारक आमचा. त्यांच्या बलिदानाचा संदर्भ. अनेकांनी देशासाठी सुख त्यागले. हे शक्तीप्रदर्शन. ही वज्रमूठ हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी. दोन्ही मूठी आवळून सभेतील लाखो उपस्थितांनी पाठिंबा दिला.