मीच राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष; वय हा मुद्दाच नाही, 92 व्या वर्षीही लढू शकतो!-शरद पवार 

नवी दिल्ली,​६​ जुलै  / प्रतिनिधी:- अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी पक्ष फुटला आहे. शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षावर देखील दावा केला आहे. यानंतर शरद पवार वयाच्या 83 व्या वर्षी पक्षाची पुन्हा बांधणी करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. मात्र, पवारांचा हाच वयाचा मुद्दा टीकेचा मुद्दा ठरला आहे. अजित पवारांनी साहेब आता तरी थांबा म्हणत शरद पवार यांचे वय काढले. वय हा मुद्दाच नाही, 92 व्या वर्षीही लढू शकतो असं म्हणत शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर जबदस्त पलटवार केला.

वयावर आक्षेप घेणाऱ्या अजित पवार यांना सडेतोड उत्तर

शरद पवारांनी दिल्लीत बोलवलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि अजित पवार यांच्यासह 9 मंत्र्यांना निलंबित करण्याचा ठराव केला आहे. यासह इतर महत्त्वाचे आठ ठराव मंजूर करण्यात आले. आपणच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे पवारांनी यावेळी ठामपणे सांगितलं. तसंच आपण 92 वर्षांपर्यत लढणार असा सडेतोड प्रत्युत्तर त्यांनी वयाच्या मुद्यावर अजित पवारांना दिले. राष्ट्रीय कार्यकारिणीचे एकूण 25 सदस्य असून यातील 21 सदस्य बैठकीला हजर होते.  

 या बैठकीत एकूण आठ महत्वाचे ठराव मंजूर करण्यात आले आहेत. या बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी सांगितलं की, “2019 मध्ये काही लोकांनी त्यांच्या सह्यांचं पत्र दिलं होतं ही गोष्ट खरी आहे. त्यात कुणाबरोबर युती करावी, पक्षाचं पुढील धोरण काय असावं. यावर चर्चा करण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं. ती मी बैठक बोलवा असं म्हटलं होतं. मात्र, त्यानंतर निवडणूक आली आणि त्यावर चर्चा झाली नाही.” असं पवार म्हणाले.

मीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचा अध्यक्ष आहे. दुसरा कोणी काही बोलत असेल तर त्याला काही अर्थ नाही, असेही पवार यावेळी म्हणाले. अजित पवारांनी तुमच्यावर वैयक्तिक हल्ला चढवलाय, तुमचं वय झालंय असं म्हटलंय, यावर काय सांगाल? असा प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना मी 82 किंवा 92 वयाचा असेन तरी काम करत राहणार असे पवारांनी सांगितले. 

या विषयावर बोलताना पवार पुढे म्हणाले की, “2024 मध्ये महाराष्ट्रातील सत्ता बदलेल याचा मला पुर्ण विश्वास आहे. आज सत्तेत असलेल्यांना लोक दूर करतील. राज्यात विरोधी पक्षांविरोधात ज्या प्रकारच्या गोष्टी करण्यात आल्या. त्यांची त्यांना किंमत चुकवावी लागेल”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

ऐंशी वर्ष झाली, तुम्ही कधी थांबणार आहात की नाही?

अजित पवारांनी वयाच्या मुद्द्यावरुन शरद पवारांवर थेट हल्लाबोल केला होता. साहेब वयाची ऐंशी वर्ष झाली, तुम्ही कधी थांबणार आहात की नाही? असा सवाल अजित पवारांनी विचारला होताय. कुणाच्या पोटी जन्माला आलो ही चूक झाली का? अशी खंत देखील अजित पवारांनी व्यक्त केली होती.  फक्त वयाच्या मुद्द्यावरुन सवाल करत अजित पवार थांबले नाहीत तर शरद पवारांच्या निवृत्तीसंबंधी सुप्रिया सुळेंशीही बोललो होतो तो किस्साही अजित पवारांनी सांगितला. वयाच्या मुद्द्यावरुन सुप्रिया सुळेंशी बोललो तर त्या म्हणतात की साहेब हट्टी आहेत असं म्हणत अजितदादांनी आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली. शपथविधीनंतर  झालेल्या बैठकीत अजित पवार बोलत होते. 

माझ्या बापाचा नाद करायचा नाय

माझ्या बापाचा नाद करायचा नाय… वय फक्त नंबर आहे… आजपासून नव्या संघर्षाला सुरुवात.. असं म्हणत सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना खुलं आव्हान दिले होते.