अजित पवार ,प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासह ९ आमदार निलंबित ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकरणीत ठराव

अजित पवार गटाला मोठा धक्का! 

नवी दिल्ली,​६​ जुलै  / प्रतिनिधी:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आज दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत खा. प्रफुल पटेल, खा. सुनील तटकरे, एस. आर. कोहली यांच्यासह पक्षाच्या बंडखोर ९ आमदारांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला कार्यकारिणी समितीचे १० सदस्य उपस्थित होते. निलंबित सदस्यांना पत्र पाठवण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केरळचे प्रदेशाध्यक्ष तथा कार्यकारिणी सदस्य पी. सी. चाको यांनी दिल्ली येथील पत्रकार परिषदेत दिली.

देशात किंवा अन्य कुठेही जे कोणी पक्षाच्या विचारधारेच्या विरुद्ध जाणार त्यांना निलंबित करण्याचा पूर्ण अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आहे. आम्ही विचारधारा, धर्मनिरपेक्षता याबाबत कधीच तडजोड करू शकत नाही. देशाच्या विकासाच्या मुद्द्यांना प्राधान्य देणार, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

अजित पवारांसोबत शपथ घेतलेल्या 9 आमदारांवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अपात्रतेची कारवाई केली होती. त्यांच्यावर आता निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय राष्ट्रीय कार्यकरणीत झाल्याचे शरद पवार यांनी जाहीर केले. उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, हसन मुश्रीफ, धर्मराव आत्राम, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.