बैठकीत सकारात्मक चर्चा; पण काहीजण राजकीय पोळी भाजतात-उपमुख्यमंत्री अजित पवार 

विरोधकांनी लाठीमाराचे आरोप सिद्ध केल्यास आम्ही राजकारण सोडू-अजित पवार 

उपसमितीच्या बैठकीनंतर अजितदादा काय म्हणाले?

मुंबई ,४ सप्टेंबर /प्रतिनिधी :- मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने उपसमितीची एक बैठक आज झाली. या बैठकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , अजित पवार  यांनी पत्रकार परिषद घेतली. ‘जालनात जे घडलं तसं व्हायला नको होतं, अशी भूमिका राज्यातल्या प्रमुखांची आणि राज्य मंत्रिमंडळातल्या सर्वांचीच आहे. अशा प्रकारचे प्रसंग येतात तेव्हा सर्वांनीच राज्याचं हित डोळ्यांसमोर ठेवून निर्णय घ्यायला पाहिजे. परंतु काही राजकीय पोळी भाजली जाते का, स्वार्थ साधला जातोय का? अशा प्रकारचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे’, असं अजितदादा यावेळेस म्हणाले.

अजितदादा म्हणाले, समाजातील वेगवेगळे घटक मग ते मराठा असोत, धनगर असोत किंवा मुस्लिम असे अनेक समाज आपल्याला आरक्षण मिळावं म्हणून मागणी करत असतात आणि त्यांच्या मागणीची पूर्तता करण्याचा प्रयत्न राज्यकर्ते करत असतात. परंतु घेण्यात येणारा निर्णय हा कायद्याच्या चौकटीत देखील बसला पाहिजे. सुप्रीम कोर्टात तो मान्य झाला पाहिजे. वेगवेगळ्या राज्यांसंदर्भात वेगवेगळ्या प्रकरणांचे निकाल सर्वोच्च न्यायालय देतं. याहीवेळेस त्यात अडचण येऊ नये, अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करत आहोत.

पुढे ते म्हणाले, एक गोष्ट मान्य करावीच लागेल की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हायकोर्टात त्यांनी घेतलेलं मराठा आरक्षण हे टिकलं. सुप्रीम कोर्टात ते पुन्हा पाचारण्यात आलं. त्यानंतर एकनाथ शिंदेजी देखील वेळोवेळी प्रयत्न करत आहेत. परंतु त्याला अजूनही ठोस उत्तर मिळालेलं नाही. सुप्रीम कोर्टाने कोणत्या कारणासाठी ते नाकारलं आहे याचा बारकाईने अभ्यास करुन कमिटी नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा सगळ्या बाबी असल्याची माहिती अजितदादांनी दिली.

नुकसान कुणीच कुणाचं करु नये

अजितदादांनी यावेळेस मराठा समाजाला आवाहन केलं की, सध्या जे काही वेगवेगळ्या ठिकाणी बंद चालू आहेत, एसटींची जाळपोळ चालू आहे ते एक प्रकारे आपल्या राज्याचंच नुकसान आहे. मागच्या काळात मराठा समाजाची जी आंदोलनं झाली ती इतकी शांततापूर्ण होती की त्यांचं देशपातळीवर कौतुक झालं. परंतु आता मात्र त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला. शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे, तो कोणीच हिरावून घेणार नाही. मात्र आपल्यामुळे आपल्याच समाजातील लोकांना त्रास होईल अशा पद्धतीचं नुकसान कुणीच कुणाचं करु नये.

उपसमितीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा

अजित पवार पुढे म्हणाले की, पोलिसांनी मराठा आंदोलकांवर जो लाठीहल्ला केला त्यासंदर्भात राजकारण केलं जात आहे. वरुन आदेश आले, असं काहीजण बोलत आहेत. विरोधकांनी लाठीमाराचे आदेश वरुन आल्याचं सिद्ध केलं तर आम्ही आजपासून राजकारण सोडू. आता शांततेची आणि आंदोलन थांबण्याची गरज आहे. उपसमितीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली, असं अजितदादांनी स्पष्ट केलं. मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी उदयनराजे, गिरीश महाजन गेले होते. त्यासंबंधीचा तोडगा निघणार आहे, असं ते म्हणाले.