अतिवृष्टीमुळे नुकसान,नदी-नाल्यांना पूर,पालकमंत्री अशोक चव्हाण यांची पाहणी

पंचनामे करुन शासनास तात्काळ अहवाल पाठविण्याचे दिले निर्देश

परभणी​/नांदेड :गेल्या दोन-चार दिवसांपासूनच्या संततधार पावसाने तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व छोट्या-मोठ्या नदी-नाल्यांना मोठ मोठे पूर आले आहेत. या पुराने रस्ते वाहतुकीसह काही गावांचा संपर्कसुध्दा काही काळापुरता ठप्प झाला, तर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. शनिवारी रात्री मध्यम , तर  रविवारी पहाटे व दुपारी मध्यम ते मुसळधार पाऊस झाला. यामुळे बहुतांश नद्या, ओढे दुथडी भरून वाहत होते. त्यामुळे सखल भागातील पुल जलमय झाले होते.

सेलू तालुक्यातील कुपटा, पालम तालुक्यातील काही गावांचा काही काळापुरता संपर्क तुटला होता. राष्ट्रीय महामार्गावरील परभणी ते कोल्हा दरम्यान ताडबोरगाव जवळील अरूंद पुलावरून पाणी वाहत होते. पर्यायी रस्तासुध्दा चिखलमय झाला. या रस्त्यावरील वाहतुक संथगतीने सुरू होती. रविवारी ही पावसाचा जोर कायम होता. जायकवाडी पाठोपाठ माजलगाव प्रकल्पातून गोदावरी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीस पूर आला आहे.  तारूगव्हाण, ढालेगाव, मुद्गल, मुळी व डिग्रस बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत. गोदावरीचे पाणी गंगाखेडात नृसिंह मंदिराच्या शिखरापर्यंत  पोचले होते. 
सेलू तालुक्यातील निम्न दुधना  प्रकल्पातून रविवारी सकाळी सहा वाजता चार व दुपारी दोन वाजता दोन दरवाजे ०.५ मीटरने उघडण्यात आले.  त्यामुळे दुधना नदीचे पात्र दुथडी भरून वाहत होते. 


जिंतूर तालुक्यातील येलदरी जलाशयाचे रविवारी सर्व दहा दरवाजे उघडून पूर्णा नदीच्या पात्रात पाणी सोडल्या गेले. त्यामुळे पूर्णा नदीससुध्दा पूर आला आहे.* परभणीजवळील रहाटी येथील बंधारा पाण्याखाली गेला होता. सोनपेठ तालुक्यातील वाण नदीस पूर आला होता. जिंतूरातील कर्परा नदीचे पात्रही दुथडी भरून वाहत होते. रविवारी ( २० सप्टेंबर ) सकाळपर्यंत परभणी तालुक्यात ३८.३ मिमी, गंगाखेड १५ मिमी, पाथरी ४७.१, जिंतूर ३३.१ मिमी, पूर्णा ११.४ मिमी, पालम ३१.५ मिमी, सेलू २१.१ मिमी, सोनपेठ ३१.८ मिमी, मानवत तालुक्यात २४.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केली प्रत्यक्ष पाहणी

नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीसह अनेक भागात नदी-नाले, ओढ्यांना पूर आल्यामुळे काही भागातील शेतकऱ्यांची शेतातील माती पिकासह वाहून गेली आहे. या नुकसानीची मला कल्पना असून जिल्ह्यात यापूर्वीच एक व्यापक आढावा बैठक बोलवून प्रत्येक ठिकाणचे पंचनामे करण्याचे निर्देश मी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. शासन स्तरावरुन शेतकऱ्यांसाठी जे काही करता येणे शक्य आहे ते जरुर करु या शब्दात नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या बांधावर जाऊन धीर दिला.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचा झालेल्या आढावा घेण्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह भोकर तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन पाहणी केली. शेताच्या बांधावरच त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब कदम, जिल्हा परिषद सदस्य प्रकाशराव भोसीकर, भोकरचे उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. कोरे, आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी भोकर तालुक्यातील खरबी, वाकद, आमदरी, भोसी, धानोरा, अर्धापूर तालुक्यातील अर्धापूर, मालेगाव या गावात त्यांनी शेतीच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी अडचणी समजून घेतल्या. अनेक गावांमध्ये पाण्याच्या अतिप्रवाहामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून लहान मोठे नाले यांच्या जलव्यवस्थापनाच्या दृष्टिने विचार करुन उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी कृषि विभागाला दिले. नाला खोलीकरण करुन ज्या-ज्या ठिकाणी बंधारे शक्य आहेत त्याचे सर्वेक्षण, पूलाची उंची वाढविणे, पांदण रस्ता दर्जावाढ, स्मशानभुमीला संरक्षण भिंत, आमदरी गावातील नादुरुस्त असलेल्या दोन वन तलावाची दुरुस्ती याबाबत त्यांनी आढावा घेतला.

पीक विमा भरलेल्या व पिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या तक्रार अर्जांची स्विकृती करुन तात्काळ त्याचे पंचनामे करणे, विमा कंपनीशी समन्वय साधत शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे विमा मिळण्यासाठी तात्काळ मदत करणे यावर त्यांनी भर देत अधिकाऱ्यांना निर्देश देत ज्या ठिकाणी नवीन काम हाती घेतले जाणार आहे त्याचे अंदाजपत्रकही सादर करण्यास सांगितले. खरबी ग्रामपंचायत कार्यालयात त्यांनी ग्रामसभा घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. ग्रामसेवक आणि तलाठी या दोघांनी समन्वय साधत प्रत्येक गावात चावडी वाचन, नुकसानीचे पंचनामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी तत्पर रहा असेही त्यांनी स्पष्ट केले. खरबीचे सरपंच गंगाधर लक्ष्मण पाशीमवाड यांनी खरबी ग्रामपंचायतीच्यावतीने त्यांचे स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *