धर्मवीर की स्वराज्यरक्षक वादावर पहिल्यांदाच शरद पवार यांची प्रतिक्रिया

पुणे,​३​ जानेवारी / प्रतिनिधी :-राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते असे  विधान केले  होते. अजित पवार यांच्या विधानानंतर राज्यात भाजपसह शिंदे गटातील नेत्यांनी टीका केली. तसेच अजित पवार यांच्याविरोधात आंदोलनही करण्यात आले.आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यातील सेंट्रल ऑफ एक्सलन्स फॉर डेअरीच्या पाहणी दौऱ्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी विविध विषयांवर आज माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी संभाजी महाराज हे धर्मवीर की स्वराज्यरक्षक यावरून सुरू असलेल्या वादावर आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, अजित पवार यांचे स्टेटमेंट पाहिले. संभाजी महाराजांसंबंधी ते लिखाण आहे. माझ्यासमोर दोन प्रकारची लिखाण आली आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एकेकाळचे प्रमुख व स्वातंत्र्यवीर सावरकर या दोन व्यक्तींनी संभाजी महाराजांबद्दल लिहिलेले लिखाण हे कोणाला पसंद पडणारे नाही परंतु ते कधी काळी लिहिले होते ते कारण नसताना उखरून काढून राज्यामध्ये वातावरण खराब करण्यात अर्थ नाही.

स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर हा प्रश्न आहे त्यामध्ये ज्या नागरिकांना, घटकाला, व्यक्तीला संभाजी महाराजांबद्दल बोलताना स्वराज्यरक्षक म्हणून त्यांच्या कामगिरीची आठवण होत असेल तर त्यासंबंधी उल्लेख करण्यात काहीही चुकीचे नाही. काही घटकांना ते धर्मवीर म्हणून उल्लेख करायचा असेल तर धर्माच्या दृष्टीकोनातून ते बघत असतील तर त्याबद्दल माझी काही तक्रार नाही. त्या व्यक्तीचे ते मत आहे ते मांडण्याचा अधिकार आहे. संभाजी महाराजांना कोणी धर्मवीर, कोणी स्वराज्यरक्षक म्हणा, याबद्दल माझ्या मनात कोणती शंका नाही असेही शरद पवार म्हणाले.

शिवछत्रपती गेल्यानंतर राज्यावर हल्ले होत असताना स्वत:च्या भवितव्याचा विचार न करता राज्याचे रक्षण करण्यासाठी त्यांनी महत्वाचे काम केले त्याची नोंद आपण घेतली तर काही चुकीचे नाही. त्यामुळे यात वाद करण्याचे काही कारण नाही, असे आवाहन पवार यांनी केले.