रांजणगाव येथे ‘इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर’; केंद्राकडून पहिल्या टप्प्यात ६२ कोटींचा निधी वर्ग

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्र शासनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले आभार

मुंबई ,४ सप्टेंबर /प्रतिनिधी :- राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणानुसार पुण्याजवळील रांजणगाव येथे महाराष्ट्रातील पहिला ‘इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (EMC) प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यातील ६२ कोटी ३९ लाख रुपयांचा निधी एमआयडीसीकडे वर्ग केला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्र शासनाचे आभार मानले आहेत.

देशात इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनांना चालना देण्यासाठी केंद्र शासनाने देशात सुधारित इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (ईएमसी २.०) अंमलबजावणी सुरु केली आहे. देशात नोएडा, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन केंद्रे असून तेथे विविध बहुराष्ट्रीय कंपन्या आणि भारतीय स्टार्ट अप्स यांनी युनिट सुरू केली आहेत. रांजणगाव येथे २९७.११ एकर जागेवर ‘इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर’ उभारणीस ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी केंद्राने मान्यता दिली आहे. या प्रकल्पाची किंमत ४९२ कोटी ८५ लाख १९ हजार रुपये असून त्यात केंद्र शासनाकडून २०७ कोटी ९८ लाख रुपये वित्तीय सहाय्य उपलब्ध होणार आहे. यातील ६२ कोटी ३९ लाख रुपयांचा पहिला हप्ता केंद्र शासनाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने एमआयडीसीकडे वर्ग केला आहे.

रांजणगाव येथे उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात आयएफबी, एलजी आणि गोगोरो ईव्ही स्कूटर यासारख्या कंपन्यांचा सहभाग असेल. या प्रकल्पामुळे हा परिसर ‘इलेक्ट्रॉनिक क्लस्टर’ म्हणून नावारूपास येईल, अधिक उद्योजक, कंपन्या तेथे आकर्षित होऊन त्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला आहे. हा इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत आणि एमआयडीसीने विशेष परिश्रम घेतले असून त्यांचेही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.