वाचन प्रेरणा दिनानिमित्त साहित्ययान

मराठी भाषा विभाग आणि माहिती व जनसंपर्क यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन सोहळा
मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या अभिवाचनाने उद्घाटन

मंबई, दि.१४ : मराठी भाषा विभागाच्यावतीने माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस (दि.१५) वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने साहित्ययान या मैफिलींचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची सुरूवात मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या अभिवाचनाने होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात मान्यवर साहित्यिक, साहित्यप्रेमी अधिकारी देखील सहभागी होणार आहेत.

यंदाचा वाचन प्रेरणा दिन हा राज्य मराठी विकास संस्था आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या कार्यक्रमाची व्हिडीओ माहिती www.YouTube.com/maharashtradgipr या युट्यूब चॅनेलवर प्रसारित होणार आहे.

कविता, कादंबरी, कथा, ललित लेख, आत्मचरित्र अशा वैविध्यपूर्ण साहित्य प्रकारांना अभिवाचकांच्या वैयक्तिक आवडीची जोड असा अनोखा रंग या मैफलीत रंगणार आहे.

असे आहेत सहभागी :-

साहित्ययान भाग १ मध्ये :- मराठी भाषामंत्री सुभाष देसाई, खासदार शरद पवार, राज्यमंत्री मराठी भाषा विश्वजित कदम, सिने कलावंत सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी, सौ. स्वरूपा राजेंद्र पाटील, सयाजी शिंदे, मधुरा वेलणकर, हेमंत टकले, भालचंद्र नेमाडे, किशोर कदम, तन्वी परांजपे, वरिष्ठ अधिकारी भूषण गगराणी, विश्वास नांगरे -पाटील, राजेंद्र भागवत, विकास खारगे, रंगनाथ पठारे हे सहभागी होतील.

साहित्ययान च्या दुसऱ्या भागात मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे हे मारुती चितमपल्ली यांच्या ‘जंगलाचं देणं’ या पुस्तकातील एक उतारा वाचणार असून समारोप करताना उपमुख्यमंत्री अजित पवार हे राम प्रधान संपादित ‘शब्दांचे सामर्थ्य’ या पुस्तकातील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या लेखातील एका उताऱ्याचे वाचन करणार आहेत.

साहित्ययान भाग २सहभाग : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे, साहित्यिक लीना भागवत, गिरीश पतके, श्रीरंग गोडबोले, श्रीनिवास नार्वेकर, विश्वास पाटील, विलास शिरसाट, प्रमोद पवार, सुशांत देवळेकर, ऋचिका खोत, ओंकार थोरात, आनंद गांगल, दासू वैद्य, हिमांशू स्मार्त, उपेंद्र लिमये, डॉ. निशिगंधा वाड, शशांक शेंडे सहभागी होणार आहेत.