उद्धव-राज यांच्या एकत्र येण्यावर राज ठाकरेंनी लावला फुलस्टॉप!

मनसेकडून उद्धव ठाकरे यांना कोणताही प्रस्ताव नाहीमनसे आमदार राजू पाटील यांचे स्पष्टीकरण

मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र यावे, अशी भूमिका महाराष्ट्र सैनिक मांडत आहेत. हे दोघे भाऊ एकत्र येणार का? आशयाचे बॅनर्सही झळकले होते. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उद्धव ठाकरेना दोन वेळा एकत्र येण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता, या चर्चांना उधाण आले होते. मात्र राज ठाकरेंनी प्रस्तावाच्या चर्चांचे खंडन केले आहे. मनसेकडून उद्धव ठाकरे गटाला कोणताही प्रस्ताव देण्यात आलेला नाही, अशी माहिती राज ठाकरेंनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिली आहे.

आज झालेल्या बॅनरबाजी दरम्यान संजय राऊत आणि मनसेचे अभिजीत पानसे यांनी एका गाडीतून प्रवास केला. त्यानंतर राऊत मातोश्रीवर गेले आणि पानसे शिवतीर्थवर गेले आणि पुन्हा चर्चेला उधाण आलं. पण राज यांनी या चर्चांना फुलस्टॉप दिला आहे.

मनसे आमदार राजू पाटील यांचे स्पष्टीकरण

मनसे आमदार प्रमोद ( राजू )पाटील यांनी मनसेकडून उद्धव ठाकरे यांना कोणताही प्रस्ताव नाही असे स्पष्ट केले.

महाराष्ट्रात गेल्यावर्षी मोठा राजकीय भूकंप झाला होता.त्यानंतर शिंदे- फडणवीस सरकार स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण झाले.आता राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी त्यांचा गट घेऊन सरकार मध्ये सामील झाले. राष्ट्रवादीतील ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. राज्यातील हे वेगळे गणित जुळताना पाहून मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एकत्र यावे असे बॅनर अनेक शहरात लागल्याचे दिसते. त्यात मनसेचे अभिजित पानसे यांनी संजय राऊत यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.

मनसेची नेमकी भूमिका काय असणार आहे ? उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येणार का ? यावर मनसे नेते तथा आमदार राजू पाटील यांना पत्रकारांनी विचारले असता असा कोणताही प्रस्ताव देण्यात आला नाही असे स्पष्ट केले. अभिजित पानसे आणि संजय राऊत यांचे पुर्वीपासून संबंध असल्याने ही भेट राजकीय नाही. आमदार पाटील म्हणाले, मनसेचे सात नगरसेवक आपल्या पक्षात घेताना उद्धव ठाकरे यांनी मनसेचा विचार केला नव्हता.आता ते अडचणीत असताना आम्ही का त्यांना साथ देऊ ? मराठी माणसाला जरी वाटत असले तरी त्यांना तसे वाटतेय का ? त्यांना युती नाही तर भीती वाटत आहे.

आमदार राजू पाटील यांनी २०१९ साली महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीवर प्रकाश टाकताना यात देवेंद्र फडणवीस यांची चूक नसल्याचे सांगितले. मतदारांच्या कौल ओळखून उद्धव ठाकरे यांनी विचार करायला हवा होता पण तसे झाले नाही. त्यामुळे त्यांच्याबरोबर जनताही भोग भोगतेय.