नेतृत्वबदल नाहीच ! काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी कायम

नवी दिल्ली : काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक संपली असून सोनिया गांधी तूर्तास हंगामी अध्यक्ष पदावर कायम राहणार आहेत. पुढच्या ६ महिन्यात काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे. सोनिया गांधींना मदतीसाठी ४ सदस्य कमिटी बनवणार असून जी दैनंदिन कामकाजात मदत करणार आहे.सोनिया गांधी सध्या पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष म्हणून कायम राहणार आहेत. काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे, सीडब्ल्यूसीने या निर्णयाला सहमती दर्शविली आहे. काँग्रेस नेतृत्वाचा मुद्दा देशात चर्चेत होता. आज दिल्लीत काँग्रेस नेतृत्वाच्या प्रश्नावर खुली चर्चा झाली. या बैठकीदरम्यान पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटलं की, ‘त्यांना पक्षाध्यक्षपदी पुढे रहायचे नाही. परंतु अनेक नेत्यांनी त्यांना पदावर कायम रहाण्याचे आवाहन केले आहे.’

sonea gandhi_1  

काँग्रेस  कार्यसमितीच्या आज सोमवारी झालेल्या वादळी बैठकीत प्रचंड वादावादी आणि आरोपप्रत्यारोप झाले. सोनिया आणि राहुल गांधी समर्थक तसेच विरोधक अशी सरळसरळ उभी फूट पडली. सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची तयारी दर्शवली, तर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनिंसग आणि ज्येष्ठ नेते ए. के. अॅण्टोनी आदी नेत्यांनी त्यांना अध्यक्षपदी कायम राहण्याची विनंती केली. प्रचंड खडाजंगी झाल्यानंतर पुढील सहा महिन्यांसाठी अंतरिम अध्यक्ष म्हणून कायम राहण्यास सोनिया गांधी तयार झाल्या. याचाच अर्थ, सहा महिन्यानंतर काँग्रेसमध्ये अध्यक्षपदासाठी निवडणूक घेणे अनिवार्य होणार आहे.

सोनिया गांधी यांच्या हंगामी अध्यक्षपदाला एक वर्षे पूर्ण झाल्याने नव्या अध्यक्ष निवडीची चर्चा सुरु झाली होती. अशातचं पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांनीच पक्षाच्या अवस्थेबद्दल जागृत करणारं पत्र सोनिया गांधींना लिहिण्याचं धाडस दाखवलं. त्यामुळे अधिकचं गुंता निर्माण झाला होता. मात्र, अखेर सोनिया गांधी यांचीच ६ महिन्यांसाठी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील सहा महिन्यात नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे. काही ज्येष्ठ नेत्यांनी पत्र लिहून केलेली नेतृत्व बदलाची मागणी, सोनिया गांधींनी पद सोडण्याची व्यक्त केलेली इच्छा, राहुल गांधींनी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्यास दिलेला नकार आणि कार्यकारी समितीच्या बैठकीत वादळी चर्चा होऊनदेखील हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी कायम आहेत.

 
जवळपास सात तास चाललेल्या वादळी बैठकीनंतर नव्या अध्यक्षाची निवड होईस्तोवर अंतरिम अध्यक्ष पदावर कायम राहण्याची तयारी सोनिया गांधी यांनी दर्शवल्यामुळे काँग्रेस पक्षाने सुटकेचा श्वास सोडला. पक्षाच्या कार्यालयासमोर मोठ्या संख्येत कार्यकर्ते जमले होते. गांधी घराण्यातील व्यक्तीनेच काँग्रेसचे नेतृत्व करण्याची मागणी हे कार्यकर्ते करित  होते.
 
 
राहुल गांधी आक्रमक भूमिकेत

बैठकीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष असलेले राहुल गांधी अतिशय आक्रमक भूमिकेत होते. राहुल गांधी यांनी पत्र पाठवणार्‍या गटाचे नेते मानल्या जाणार्‍या गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. पत्र पाठविण्याच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राहुल गांधी म्हणाले की, सोनिया गांधी रुग्णालयात दाखल असताना पत्र का पाठवण्यात आले? राजस्थानमधील काँग्रेसचे सरकार आपल्या अस्तित्वाची लढाई लढत असताना हे पत्र पाठवण्यात आले. पत्र जाणीवपूर्वक प्रसिद्धी माध्यमातून फोडण्यात आले. पत्रातील मुद्यावर चर्चा करण्याची योग्य जागा कॉंग्रेस कार्यसमिती आहे, प्रसिद्धी माध्यम नाही. राहुल गांधी यांच्या या भूमिकेला प्रियांका वढेरा यांनी  पाठिंबा  देत, आझाद यांच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. तुम्ही बैठकीत जे बोलत आहात, ते पत्रात लिहिलेल्या मजकुरापेक्षा खूप वेगळे आहे, असा टोला प्रियांका यांनी लगावला.
 
मनमोहनिंसग आणि अॅण्टोनी यांनी फटकारले
पत्र पाठवण्याबद्दल माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनिंसग तसेच ए. के. अॅण्टोनी यांनीही नाराजी व्यक्त केली. पक्षाचा नवा अध्यक्ष निवडला जाईस्तोवर सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदावर कायम राहावे, अशी आग्रही भूमिका या दोन नेत्यांनी घेतली. नेतृत्व परिवर्तनाची मागणी करणार्‍या नेत्यांनाही मनमोहनिंसग आणि अॅण्टोनी यांनी फटकारले. पक्षाच्या नेत्याला कमजोर करणे म्हणजे पक्षाला कमजोर करण्यासारखे असल्याचे अॅण्टोनी यांनी म्हटले. माझा एक सहकारी असे पत्र लिहूच कसे शकतो, याबद्दल त्यांनी आश्चर्यही व्यक्त केले.
 
 
अहमद पटेल बरसले
अहमद पटेल यांनीही पत्र पाठवणार्‍या असंतुष्ट नेत्यांबद्दल नाराजी व्यक्त केली. गुलाम नबी आझाद, मुकुल वासनिक आणि आनंद शर्मा पक्षातील प्रमुख पदावर विराजमान आहेत. किमान त्यांनी तरी अशी भूमिका घ्यायला नको होती, असे पटेल म्हणाले. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी तातडीने स्वीकारावी, असे पटेल म्हणाले.
 
 
पत्र पाठवणारे काँग्रेसचे नेते
सोनिया गांधींना पत्र पाठवणार्‍या नेत्यांमध्ये अनेक माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश होता. यात गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, आनंद शर्मा, मनीष तिवारी, शशी थरूर यांचा समावेश होता. भूपिदंरिंसह हुडा, रािंजदरिंसह भट्टल, एम. वीरप्पा मोईली आणि पृथ्वीराज चव्हाण या माजी मुख्यमंत्र्यानीही पत्रावर स्वाक्षरी केली होती. राज बब्बर, अरिंवदरिंसह लवली, कौलिंसह हे माजी प्रदेश काँग्रेस अध्यक्षही या मोहिमेत सहभागी झाले होते. याशिवाय काँग्रेस महासमितीचे मुकुल वासनिक, विवेक तन्खा, जितीनप्रसाद यांचाही समावेश होता. अखिलेशप्रसादिंसह, संदीप दीक्षित, योगानंद शास्त्री, कुलदीप शर्मा यांचाही या मोहिमेेत सहभाग होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *