राऊतांचा दसरा जेलच्या कोठडीतच!

राऊतांची कोठडी लांबली,पुढील सुनावणी १० ऑक्टोबरला

मुंबई ,२७ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- मुंबईतील बहुचर्चित पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी सुमारे दोन महिन्यांपासून तुरुंगात असलेले शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या जामिनावर आज सुनावणी झाली. विशेष पीएमएलए न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान राऊत उपस्थित होते. संजय राऊत यांच्या वकिलांनी जामीन मंजूर करण्याच्या बाजूने युक्तिवाद केला. मात्र, न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी १० ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे राऊतांना यंदाचा दसरा जेलच्या कोठडीतच  काढावा लागणार आहे.

संजय राऊत हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी अनेकदा टीकेचे धनी झाले आहेत. शिवसेनेच्या फुटीला तेच जबाबदार असल्याचा त्यांच्यावर शिंदेगटाचा आरोप आहे. महाविकास आघाडीच्या काळात राऊत बऱ्याचदा वाचाळ वक्तव्य करून लक्ष वेधून घेत असत. अखेर पत्राचाळप्रकरणी संजय राऊत अडचणीत सापडले आणि १ ऑगस्ट रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने त्यांना ताब्यात घेतले. राउतांवर भ्रष्टाचारसोबत एका महिलेला धमकावल्याचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
 
काय आहे पत्रा चाळ घोटाळा
 
२००७ मध्ये, महाराष्ट्र गृहनिर्माण विकास प्राधिकरण (म्हाडा) आणि गुरु कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्यात मुंबई पश्चिम उपनगरातील सिद्धार्थ नगर, गोरेगाव येथील पत्रा चाळ येथे ४७ एकर जागेवर ६७२ कुटुंबांच्या घरांच्या पुनर्विकासासाठी सोसायटीने करार केला होता. या करारानुसार कंपनी ३५०० हून अधिक फ्लॅट्स बनवून म्हाडाला देणार होती. त्यानंतर उर्वरित जमीन खासगी विकासकांना विकायची होती. राकेश वाधवान, सारंग वाधवान, प्रवीण राऊत आणि डीएचआयएलचे गुरु आशिष हे या कंपनीचे संचालक होते.
 कंपनीने म्हाडाची दिशाभूल करून पत्रा चाळचा एफएसआय नऊ वेगवेगळ्या बिल्डरांना विकून ९०१ कोटी रुपये जमा केल्याचा आरोप आहे. त्यानंतर मीडोज नावाचा नवीन प्रकल्प सुरू करून फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली १३८ कोटी रुपये गोळा केले. मात्र ६७२ लोकांना सदनिका देण्यात आल्या नाहीत. अशा प्रकारे पत्रा चाळ घोटाळ्यात १०३९.79 कोटी रुपयांचा घोटाळा झाला. त्यानंतर २०१८ मध्ये म्हाडाने गुरु कन्स्ट्रक्शन कंपनीविरुद्ध एफआयआर दाखल केला.
 
 
पत्रा चाळ आणि संजय राऊत कनेक्शन
 
गुरु कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक असलेले प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत. प्रवीण राऊत यांना ईडीने फेब्रुवारी २०२२ मध्ये अटक केली होती. पत्रा चाळ घोटाळ्यातून प्रवीण राऊत यांनी ९५ कोटी रुपये कमावले आणि ते पैसे नातेवाईक आणि मित्रांना वाटले, असे म्हटले जाते. त्यापैकी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात ५५ लाख रुपये आले होते. या रकमेतून राऊत यांनी दादरमध्ये फ्लॅट खरेदी केला होता. ईडीने वर्षा राऊत यांची यापूर्वीच चौकशी केली आहे. फ्लॅट खरेदी करण्यासाठी प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी यांच्याकडून हे पैसे घेतल्याचे वर्षा यांनी सांगितले होते. ईडीने केलेल्या चौकशीनंतर वर्षा राऊत यांनी माधुरी यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले.