गाजर हलवा अर्थसंकल्प-उद्धव ठाकरे 

मुंबई,९ मार्च  /प्रतिनिधी :-आज अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडला. पण त्यांनी मांडलेल्या या अर्थसंकल्पावर विरोधकांनी कडाडून टीका केली. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, हा अर्थसंकल्प म्हणजे ‘गाजर हलवा अर्थसंकल्प’ असल्याचे म्हटले आहे. त्यांनी यावेळी शिंदे फडणवीस सरकारवर कडाडून टीका केली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, “महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोरोनाचे संकट होते. यावेळी अनेकदा केंद्राकडे साधारण २५,००० कोटींची जीएसटीची थकबाकी बाकी राहायची. आज सकाळीच मी छत्रपती संभाजीनगरमधल्या काही शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी अवकाळी पावसाचे पंचनामे करायला त्यांच्या बांधावर कोणीही गेलेले नाही. एकूणच आजचा अर्थसंकल्पात त्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न झाला आहे. एका वाक्यात सांगायचे झाले तर ‘गाजर हलवा अर्थसंकल्प’ असा मी उल्लेख करेन. कारण यातून बऱ्याचशा योजना या आम्ही जाहीर केल्या होत्या, त्याचेच नामांतर करुन पुढे मांडल्या आहेत.” असे मत त्यांनी व्यक्त केले.