वज्रमूठ नाही तर वज्रझूठ सभा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका

९ एप्रिलला मुख्यमंत्री अयोध्येत, एक महत्वाचे काम करत उचलला खारीचा वाटा

ठाणे ,२  एप्रिल / प्रतिनिधी :-  “छत्रपती संभाजीनगरमध्ये घेण्यात येणार महाविकास आघाडीची सभा ही वज्रमूठ नाहीतर वज्रझूठ सभा आहे” अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी त्यांनी ९ एप्रिलला अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे जाहीर केले. त्यांनी घेतलेल्या या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या ‘वज्रमूठ’ सभेवर जोरदार निशाणा साधला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत म्हणाले की, “महाविकास आघाडीचे लोकं फक्त सत्तेसाठी एकत्र आले आहेत. त्यांची वज्रमुठ नाही, तर वज्रझूठ सभा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांच्याविरोधात बाळासाहेब ठाकरेंनी जोडे मारो आंदोलन केले होते. पण आता त्यांचेच पुत्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अपमान करणाऱ्या लोकांची गळाभेट घेत आहेत. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत, हे फार वेदनादायी आहे” असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

९ एप्रिलला शिवसेनेचे सर्व आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख, प्रमुख पदाधिकारी आणि इतर कार्यकर्त्यांसोबत सर्वांना अयोध्येला जाणार आहोत. शरयू नदीवर आरतीही करणार आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

ते पुढे म्हणाले बाळासाहेबांचे आणि देशातील करोडो लोकांचे स्वप्न होते की, राम मंदिर बांधले पाहिजे. हे स्वप्न नरेंद्र मोदींनी पूर्ण केले. तसेच कार सेवेत आनंद दिघेंनी चांदीची वीट पाठवली होती. त्याप्रमाणे आम्ही सागाचे लाकूड पाठवत आहोत. हा आमचा खारीचा वाटा असेल,’ अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेला वज्रझुट असे म्हणत, महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, भगवान श्रीरामाच्या वानरसेनेने सेतू बांधताना त्या दगडांवर राम असे लिहिले म्हणून ते दगड तरंगले पण हे सर्व दगड एकत्र येऊन बुडणार आहेत. यात काही छोटे दगड आहेत तर काही मोठे दगड, असाही खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.