शिवसेना मराठी सण साजरा करायला विसरली-आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला

मुंबई : नवाब मलिकांशी मैत्री केल्यानंतर शिवसेना गणपती विसरली. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्यानंतर गोविंदा साजरा करण्यासही विसरली. शिवसेनेच्या डोक्यात केवळ एक कुटुंब सोडून काहीच नाही. मुंबईकरांनी शिवसेनेला सोडले आहे आणि भाजपाला जवळ केले आहे. आमच्या हिंदु सणांवर महाविकास आघाडी सरकार काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना निर्बंध घातले गेले. मंदिरे बंद झाली, गणपतीच्या मुर्तीच्या उंचीवर मर्यादा आली. परंतु आज सरकार बदललं आणि तरुणाईचा उत्साह, हिंदु सणाचा उत्साह पुन्हा पाहायला मिळतोय, असे म्हणत मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला टोला लगावला.

महाराष्ट्रात हिंदु सण साजरेच होणार नाही असे चित्र मागील महाविकास आघाडी सरकार काळात होते. कारण देशात कोरोना काळातही जगन्नाथ रथयात्रेपासून गंगेकिनाऱ्यापर्यंत यात्रा, उत्सव साजरे होत होते. परंतु उद्धव ठाकरेंचे सरकार हिंदुविरोधी होते. मात्र आता सरकार बदलले असून हिंदु सण मोठ्या उत्साहाने साजरे होत आहेत. मराठी माणसं जल्लोषात सहभागी होत आहेत, असे शेलार यांनी म्हटले.

आशिष शेलार यांनी सांगितले की, प्रत्येक विषयाला निवडणुकीचे राजकारण करत नाही. मुंबईकरांचे स्वप्न आपले मानून भाजपा काम करतेय. आज शहरात ३७० ठिकाणी भाजपाकडून दहिहंडीचा उत्सव साजरा करत आहे. घाटकोपरमध्ये आमदार राम कदम दरवर्षीप्रमाणे इथे दहिहंडी साजरी होतेय. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवावर आधारित ही दहिहंडी आहे. मुंबईकर जनता ही भारतीय जनतासोबत आहे, असे ते म्हणाले.

त्याचसोबत मुंबई महानगरपालिकेत मुंबईची सेवा करताना मुंबईचा असा विकास होऊ दे की, संपूर्ण जगात मुंबईचे नाव अग्रणी राहिलेच पाहिजे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार दूर करायचा आहे. त्यामुळे महापालिकेतील भ्रष्टाचाराचे तुकडे करण्याची ही हंडी फोडावी, असे यावेळी आशिष शेलार म्हणाले.