वीजबिल : कॉंग्रेससुद्धा जुमलेबाजच ?- आपचा सवाल

वीजबिलावरून थेट राहुल गांधीना आपच्या कानपिचक्या !

वीजबिल सवलत महाराष्ट्राला द्यायला कॉंग्रेस मुहूर्त शोधते आहे का ?-रंगा राचुरे

औरंगाबाद ,९ऑगस्ट /प्रतिनिधी :-

क्रांतीदिनी महाराष्ट्राच्या विविध शहरातून आम आदमी पार्टीने स्थानिक कॉंग्रेस नेत्यांच्या भेटी घेऊन थेट राहुल गांधीना पत्र देत वीजबिल सवलतीबाबत विचारणा केली. कॉंग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी  व  प्रियांका गांधी यांनी असम, केरळ व त्यापूर्वी दिल्ली निवडणुकी दरम्यान आपल्या घोषणापत्रात  नागरिकांना कॉंग्रेस सत्तेवर आल्यास असम मध्ये २०० युनिट, केरळ मध्ये १०० युनिट तसेच २०२० मधील दिल्ली निवडणुकीत ३०० युनिट वीज मोफत देण्याचे जाहीर आश्वासन दिले होते. मग महाराष्ट्रात सत्तेत सहभागी असताना या आश्वासनाची पूर्तता का करीत नाही? असा सवाल आम आदमी पार्टीने केला आहे.

Displaying WhatsApp Image 2021-08-09 at 5.41.31 PM (1).jpeg

महाराष्ट्रात महाविकास आघाडी मध्ये कॉंग्रेसही सहभागी आहे आणि कॉंग्रेसचे डॉ नितीन राऊत राज्याचे वीजमंत्री आहेत. त्यांनीही दिवाळीपूर्वी राज्यातील जनतेला १०० युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली होती. परंतु त्याची आजवर अंमलबजावणी झाली नाही. कोविड-१९ महामारी दरम्यान राज्यातील उद्योग, व्यापार व बाजारपेठा पूर्णपणे बंद झाले होते, यामुळे सामान्य नागरिक आर्थिकदृष्ट्या फारच संकटात आले आहेत. दुसऱ्या  लाटे दरम्यान अनेकांनी वीजबिल भरले नाही, त्यामुळे आता मोठ्याप्रमाणात आपले वीजमंत्री वीज कनेक्शन कापण्याची कार्यवाही करीत आहेत. जे अन्यायकारक आहे. अशी टिपण्णी आपचे राज्य अध्यक्ष रंगा राचुरे यांनी केली आहे .
या दुसऱ्या  कोरोना लाटेमध्ये मार्च, एप्रिल, मे आणि जून महिन्याचे ज्यांचा वीज वापर २०० युनिट पर्यंत आहे, त्यांना दिल्लीतील केजरीवाल सरकार ज्याप्रमाणे नियमित २०० युनिट वीज मोफत देत आहे त्याप्रमाणे राज्यातील जनतेला सूट द्यावी अशी मागणी केली आहे असे आपचे मराठवाडा अध्यक्ष डाॕ.सुभाष माने  यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य सुद्धा भारत देशातील एक राज्य आहे, जर इतर राज्यात काँग्रेस घोषणा करते तर  महाराष्ट्रात महाविकास आघाडीत कॉंग्रेस सहभागी असताना असा दुजाभाव करू नये व जनतेस दिलेली आश्वासने पाळवीत ही जनतेच्या वतीने मागणी करीत आहोत, अश्या कानपिचक्या आम आदमी पार्टीने या निवेदनातून दिल्या आहेत.

आज औरंगाबादेत आम आदमी पार्टीने   कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष  हिशम उस्मानी यांना हे निवेदन दिले , त्या वेळेस आपचे मराठवाडा अध्यक्ष डॉ .सुभाष माने , मराठवाडा संघटन मंत्री सुग्रीव मुंडे ,शहर जिल्हा समिती अध्यक्ष वैजनाथ राठोड, उपाध्यक्ष उस्मान इम्रान ,शहर सचिव दत्तू पवार ,शहर संघटन मंत्री मंगेश गायकवाड ,महिला अध्यक्ष रूपालीताई धनेधर, मजाज खान, संजय नागरे,अभय वडमारे , औरंगाबाद जिल्हा (ग्रामीण ) संघटन मंत्री अजबराव मानकर मानकर ,राजू ब्रह्मकर सह आदि  उपस्थित होते.