राष्ट्रवादीतील बंडखोरी मागे प्रफुल्ल पटेल यांचा हात? केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान मिळण्याची शक्यता

मुंबई,२ जुलै /प्रतिनिधी :-काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यपदी नियुक्ती केली. अशात माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी अजित पवारांनी काही नेत्यांसोबत केलेल्या बंडखोरीला पाठिंबा देत शरद पवार यांनाच धक्का दिला आहे.

पटेलच सुत्रधार?

अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या 8 नेत्यांसह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना-भाजप सरकारमध्ये रविवारी मंत्रपदाची शपथ घेतली तेव्हा प्रफुल्ल पटेल यांची राजभवनात उपस्थिती होती. यामुळे प्रफुल पटेल यांच्याकडे संशयाची सुई जात असल्याचं सांगण्यात येत आहे. अजित पवार आणि भाजप यांच्यात झालेल्या कराराला प्रफुल्ल पटेल जबाबदार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. मिळालेल्या माहितीनुसार त्याबदल्यात पटेल यांना केंद्रीय मंत्रीपद देण्याचं आश्वासन देण्यात आल्याची देखील चर्चा आहे.

शरद पवारांची नाराजी

पक्षात फुट पडल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी पटेल यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. पटेल यांनी स्वत: बंडखोरी विरोधात कारवाई करावी अन्याथ पक्षाच्या भूमिकेला बगल देणाऱ्या इतरांवर कारवाई करण्यास भाग पाडले जाईल, असं पवार यावेळी म्हणाले.

यावेळी बोलताना पवार म्हणाले की, “मी प्रफुल पटेल यांची पक्षाची कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली होती. त्यांनी घेतलेला निर्णय हा पक्षाचा हिताचा नाही, हे मला स्पष्ट करायचं होतं. त्यांनी आपली जबाबदारी पार न पाडल्याने माझा त्यांच्या नेतृत्वावरील विश्वास उडाला आहे. त्यामुळे मी स्वत: त्यांना कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत. अन्यथा मला योग्य ती कारवाई करावी लागेल”, असं पवार म्हणाले.

प्रफुल पटेल हे शरद पवारांचे विश्वासू शिलेदार मानले जात होते. राजधानीत असताना ते नेहमी राष्ट्रवादीच्या प्रमुखांसोबत दिसायचे. पाटणा येथे विरोधकांच्या बैठकीत देखील शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत प्रफुल पटेल यांची देखील उपस्थिती होती. मात्र, अचानक पवारांचे निष्ठावान शिलेदार असणारे प्रफुल पटेल हे त्यांच्या विरोधात कसे गेले? याबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. पटेल यांची सुरु असलेली ईडीची चौकशी हे देखील याला एक कारण असू शकते, असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.

पटेल यांची सुरु असलेली ईडी चौकशी

दिवंगत आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थाचे तस्कर इक्बाल मिर्चीच्या मालमत्तेच्या चौकशीचा भाग म्हणून ईडीकडून माजी नागरी विमान वाहतूक मंत्री तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची काही मालमत्ता जप्त करण्यात आली होती. पटेल आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सीजे हाऊसमधील चार मजल्यासह पंधराव्या मजल्यावरील निवासस्थान मागील वर्षी जुलै मध्ये एकत्र करण्यात आले होते. ज्याला नुकतंच न्यायनिवाडा प्राधिकरणाने पुष्टी दिली होती.

ई़डीकडून ऑक्टोबर 2019 मध्ये प्रफुल पटेल यांची त्यांच्या 15 मजली व्यावसायिक इमारतीच्या बांधकामासाठी त्यांची कंपनीमिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मिर्ची यांच्यातील कथित 2006-07 संयुक्त उपक्रमाच्या चौकशीचा एक भाग म्हणून चौकशी करण्यात आली होती. त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांवर उत्तर देताना त्यांनी आपल्यावर एकही गुन्हा नोंद नसून आपल्या कोणाकडून चारित्र्याचं प्रमाणपत्र घेण्याची गरज नसल्याचं म्हटलं होतं.

तसंच पक्षात झालेल्या बंडखोरीवर आणि शिंदे- फडणवीस सरकारशी केलेल्या हातमिळवणीवर बोलताना त्यांनी हा एक-दोन लोकांनी घेतलेला निर्णय नसून पक्षाच्या बहुसंख्य नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेला सामुहिक निर्णय असल्याचं सांगितलं.

पटेल यांचे बॉलीवूड, क्रिकेटर्स आणि बिझनेस टायकून यांच्याशी संबंध

माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटले हे अनेक बॉलिवूड कलाकार तसंच व्यावसायिक व्यक्तिमत्वांच्या जवळचे मानले जातात. त्यांचा मुलगा प्रजय पटेलचे लग्न हे चर्चेचा विषय़ होतं. या लग्नसोहळ्याला जयपूर येथे राजकारणी, क्रिकेटपटू तसंच चित्रपट आणि फॅशन इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी यांची उपस्थिती होती. या सोहळ्याला अनिल कपूर, सलमान खान, आणि शिल्पा शेट्टी सारख्या कलाकारांनी हजेरी लावली होती.

तसंच नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, भारताचा माजी स्टार क्रिकेटर तसंच भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षी, प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक रवी शास्त्री, कुशल उद्योगपती सुनील भारती मित्तल यांच्या सारख्या महत्वाच्या व्यक्तींनी देखील पटेल यांच्या मुलाच्या लग्नाला जयपूर येथे हजेरी लावली होती.