अजित पवार सरकारमध्ये सामील! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिंदे गटाची गोची होणार ?

मुंबई,२ जुलै /प्रतिनिधी :-अजित पवार यांनी बंडखोरी करत शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून त्यांच्यासोबत इतर आठ नेत्यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यात छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, अनिल भाईदास पाटील, बाबुराव अत्राम आणि संजय बनसोडे यांचा समावेश आहे. हा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडणार असल्याचा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. आज ते बंड प्रत्यक्षात उतरलं आहे. भाजपला राष्ट्रवादी पक्ष फोडण्यात यश आलं आहे. मात्र, यानिमित्ताने आता शिंदे गटाचं काय स्थान असणार याची चर्चा सुरु झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवेसेच्या 40 आमदारांना सोबत घेत बंडखोरी केल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षासह अजित पवार यांच्यावर मोठा हल्लाबोल केला होता.

अजित पवार हे निधी वाटप करण्यात दुजाभाव केल्याचा आरोप शिंदे यांनी केला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा गट सरकारमध्ये सामील झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाची मोठी गोची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्री मंडळ विस्तारात शिंदे गटातील आमदारांना मंत्रीपद मिळणार असं सांगितलं जात होतं. आता मात्र अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतल्याने शिंदे गटाला काय मिळणार याकडे सर्वांच लक्ष लागून गेलं आहे.

गेल्याकाही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचं सांगितलं जात होतं. तसंच ते काही दिवस सुट्टीवर देखील गेले होते. त्यानंतर राज्यातल्या प्रमुख वर्तमान पत्रात प्रकाशित झालेल्या जाहीरातीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या सर्व घटना सुरु असताना अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या आमदारांनी केलेल्या बंडामुळे सर्वाच्या भूवया उंचावल्या आहेत.