राज्यकर्ते म्हणजे रेड्यांची अवलाद:सत्ताधाऱ्यांवर टीका करताना सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली

पुणे , १ डिसेंबर /प्रतिनिधी :- गेल्या काही दिवसांपासून अनेक नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. यामध्ये आता आणखी एका नेत्याची भर पडली आहे. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना, ‘राज्यकर्ते रेड्यांची औलाद आहे,’ असे वक्तव्य केले. विशेष म्हणजे, पुण्यातील एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांची जीभ घसरली. त्यामुळे आता त्यांच्यावरही टीका होत आहे.

पुण्यातील अर्हम फाऊंडेशन आणि वास्तव कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने संवाद स्पर्धा परीक्षा उमेदवारांशी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले की, “राज्यव्यापी विद्यार्थी अधिवेशन दरवर्षी आयोजित केले तर त्याचा फायदा होईल. राज्यकर्त्यांना डोक्याची भीती वाटत असते कारण जिकडे जास्ती डोकी तिकडे सगळे राज्यकर्ते बोलायला लागतात. कारण राज्यकर्ते हे एक रेड्याची औलाद आहे. राज्यकर्त्यांना बोलायला लावायचे असेल तर आपल्याला ज्ञानेश्वरांसारखे त्या रेड्याच्या पाठीवर हात ठेवावा लागेल, कारण त्यांच्या पाठीवर हात ठेवल्याशिवाय ते वेद बोलत नाही. तसेच त्यांना डोकी जास्त दिसली. तर ते आपोआप तुम्हाला नको असलेलेही बोलून जातात.”

सरकार कोणाचेही असले तरी भ्रष्टाचार प्रचंड आहे. पैसे देणारा तरुण पुढे जातो आणि अभ्यास करणारा तरुण मागे राहतो. भ्रष्टाचार कसा संपेल या कडे लक्ष दिले पाहिजे. आज बेरोजगारीशिवाय दुसरा प्रश्न काय आहे? बेरोजगारी हा सरकारच्या अजेंड्यावरचा विषय असला पाहिजे. सदाभाऊ राजकीय नेत्यांना रेडे म्हणाले, तरी हे रेडे लोकहिताचे असले पाहिजे, असे बच्चू कडू म्हणाले.