वैजापूर येथे विजेचा धक्का लागून ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू ; काटेरी झुडुपे काढत असताना विद्युत तारेला स्पर्श

वैजापूर ,१६ जुलै /प्रतिनिधी :- वैजापूर शहरातील मोंढा मार्केट परिसरात काटेरी झुडपे कापत असताना विद्युत तारेला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून एका 42 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. विजय बाबुराव शेजवळ (वय 42 वर्षे राहणार मोंढा मार्केट परिसर वैजापूर) असे या घटनेतील मयत व्यक्तीचे नाव आहे. 

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार विजय शेजवळ हे दुपारच्या सुमारास मोंढा मार्केट परिसरातील काटेरी झाडे तोडत होते. ही झाडे तोडत असताना त्यांचा विद्युत तारेला स्पर्श झाला. विजेचा धक्का लागल्याने ते बेशुद्ध झाले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्यांना बेशुद्ध अवस्थेत तत्काळ वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक पवन राजपूत, कर्मचारी विशाल पडळकर, बनगे यांनी  घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी वैजापूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.