केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कमल किशोर कदम डी.लिट पदवीने सन्मानित

राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत स्वारातीम विद्यापीठाचा रौप्य महोत्सवी दीक्षान्त समारंभ

नांदेड ,२४ फेब्रुवारी  / प्रतिनिधी :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २५ वा दीक्षान्त समारंभ राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांच्या दूरस्थ उपस्थितीत विद्यापीठ परिसर येथे पार पडला. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे माजी शिक्षण मंत्री कमलकिशोर कदम यांना डी.लिट. ही मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाला होमी भाभा राष्ट्रीय संस्थेचे कुलपती तसेच राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर हे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

डी.लिट. पदवी मिळाल्याबद्दल नितीन गडकरी व कमलकिशोर कदम यांचे अभिनंदन करताना यंदापासून लागू होत असलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यापीठांना गतकाळातील नालंदा, तक्षशिला विद्यापीठांप्रमाणे पुनश्च प्रतिष्ठा प्राप्त करण्याची संधी उपलब्ध झाली असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

स्नातकांनी आपल्या देशातील भाषा, संस्कृती व परंपरा यांच्या सोबतच इतर देशांच्या भाषा व संस्कृतीचे अध्ययन करावे तसेच तंत्रशिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षणासोबत परीक्षा व मूल्यमापन पद्धतीमध्ये देखील बदल व्हावे अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

हरित विद्यापीठ, स्वच्छ विद्यापीठ, जलसंधारण, वृक्षारोपण आदी उपक्रमांच्या माध्यमातून स्वारातीम देत असलेल्या योगदानाबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन करताना देशाला ज्ञानाधिष्ठित जागतिक महासत्ता बनविण्याची सर्वाधिक मोठी जबाबदारी विद्यापीठांवर असल्याचे राज्यपालांनी सांगितले. पेटंट मिळविण्याच्या दृष्टीने केलेल्या संशोधनामुळे स्वारातीम हे देशातील महत्त्वाचे विद्यापीठ ठरले असल्याचे राज्यपालांनी सांगितले.  विद्यापीठ केवळ पदव्या प्रदान करणारी संस्था नसून समाज व राष्ट्र निर्मितीकरिता जबाबदार नागरिक निर्माण करणारी संस्था असल्याचे त्यांनी सांगितले.  ऑनलाईन शिक्षणाचा लाभ शिक्षणापासून वंचित असणाऱ्यांना होऊ शकतो असे सांगताना त्यांनी ऑनलाईन शिक्षणाचा पुरस्कार केला.

             “गरजेनुसार संशोधन झाल्यास सामाजिक परिवर्तन घडेल” – नितीन गडकरी

नवसृजन, उद्यमशीलता यांच्या माध्यमातून ज्ञानाचे रूपांतरण आर्थिक संपदेमध्ये झाले पाहिजे,असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केले.  ज्ञानासोबत विनम्रता व शालीनता आली पाहिजे हे सांगताना त्यांनी अभिनेता अमिताभ बच्चन व उद्योगपती रतन टाटा यांच्या विनम्र स्वभावाचे उदाहरण दिले.  उत्तम समाज निर्मितीसाठी नीतिमूल्ये आवश्यक आहे असे सांगताना स्नातकांनी प्रतिकूल विचारांचा सन्मान करण्यास शिकले पाहिजे असे त्यांनी सांगितले. जलसुरक्षेसाठी जलसंवर्धन तसेच समुद्रात जाणारे पाणी अडवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.  ‘अन्नदाता शेतकरी’ हा ऊर्जादाता झाला पाहिजे असे सांगून गरजेनुसार संशोधन झाल्यास सामाजिक परिवर्तन घडेल असे त्यांनी सांगितले.  युवकांनी रोजगारामागे न लागता संपदा निर्माण करणारे उद्योजक व्हावे, असे त्यांनी सांगितले.

तीन स्तरांवर मानव सक्षमीकरणाचा विचार झाला  – डॉ. अनिल काकोडकर

विद्यार्थ्यांच्या वैचारिक कक्षा रुंदावणे, सामाजिक व आर्थिक समस्यापूर्ती करणे तसेच समाजातील विषमता दूर करणे अशा तीन स्तरांवर मानव सक्षमीकरणाचा विचार झाला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. अनिल काकोडकर यांनी केले. देशाची गणना पुढारलेल्या देशांमध्ये व्हावी, यासाठी दरडोई उत्पन्न वाढवावे लागेल व त्यासाठी उद्योजकतेला चालना तसेच ग्रामीण भागात शेतीबरोबर नवीन संधी निर्माण कराव्या लागतील असे त्यांनी सांगितले.

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले आणि प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके तसेच विविध विभागांचे अधिष्ठाता, प्राध्यापक व  स्नातक विद्यार्थी उपस्थित होते.