खंडाळा येथे स्टोन क्रशरवरील कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या

वैजापूर,१७ डिसेंबर / प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे स्टोन क्रशरवर कामाला असलेल्या एका कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता.16)  सकाळच्या सुमारास उघडकीस आली. जितेंद्रसिंह रामवीरसिंह (32 वर्ष) रा. सराईदोड जि. मथुरा उत्तर प्रदेश असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. 

जितेंद्रसिंह हे खंडाळा येथील ओम साई स्टोन क्रेशर येथे मागील पाच वर्षांपासून ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजेच्या त्यांनी गळफास लावल्याची घटना उघडकीस आली. क्रशरच्या व्यवस्थापकाच्या ही घटना लक्षात आल्याने याबाबत पोलिसांना कळविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जितेंद्रसिंह यांना शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक मोईस बेग करीत आहे.