वैजापूर पोलिसांतर्फे 26/11 च्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्यांना रक्तदान करून अभिवादन

वैजापूर, २६ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- 26/11च्या अतिरेकी हल्ल्यात नागरिकांचे प्राण वाचविताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या स्मृती प्रीत्यर्थ वैजापूर पोलीस स्टेशन व एम.जी.एम.कॉलेज औरंगाबाद रक्त पेढी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता.26) पोलीस स्टेशन मध्ये रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरात पोलीस अधिकारी, कॉन्स्टेबल, पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते, सेवानिवृत्त फौजी यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून शहिदांना अभिवादन केले. 

पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम घाडगे, विजय नरवडे, पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील, श्रीराम काळे, विजय घोटकर, बीएसएफचे गौतम गायकवाड आदींनी  रक्तदानास सुरवात केली. सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी 26/11/ च्या घटनेची माहिती देऊन रक्तदानाचे महत्व विशद केले. त्यानंतर सर्वांनी प्रथम दोन मिनिटे उभे राहून शहिदांना श्रद्धांजली वाहिली.

एम.जी.एम.चे रक्त संकलन पथक प्रमुख डॉ. शताब्दी पाल, सहाय्यक आशुतोष देव, उत्तम नरवडे, कल्याण पाथरीकर, मच्छीन्द्र जाधव, दत्ता वाकडे, सुनील गवळी यांनी रक्त संकलित केले. या प्रसंगी उपनगराध्यक्ष साबेरखान, पारस घाटे, आमिर अली, मन्सूर अली, अमोल राजपूत,  देवकर यांनी या शिबिराला भेटी देऊन शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या उपक्रमाचे कौतुक करून शाहिदांना अभिवादन केले.