पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने महिलेचे तीन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास ; दोन अनोळखी व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल

वैजापूर शहरातील मारवाडी गल्ली येथे घडलेला प्रकार 

वैजापूर ,१४ जुलै /प्रतिनिधी :- सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करुन देतो असे म्हणून दोन अनोळखी व्यक्तींनी महिलेची फसवणूक करुन सोन्याची चैन, दोन बांगड्या, अंगठी असे जवळपास आठ तोळ्याचे दागिने लंपास केले.या दागिन्यांची किंमत सुमारे दोन लाख ९७ हजार ५०० रुपये असल्याचे लता जैन (रा.मारवाडी गल्ली, वैजापूर) यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे. हा प्रकार शुक्रवारी (ता.14) सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास शहरातील मारवाडी गल्ली भागात घडला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  लता जैन या मुलगा आनंद जैन, सुन व नातवंडांसह मारवाडी गल्ली भागात राहतात. शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरासमोर आले व त्यांनी लता जैन यांना आम्ही जैन  आहोत असे सांगितले. यावर जैन यांनी दोघांना घरात बोलावून सरबत दिले व आपण काय करता असे विचारले. त्यांनी आम्ही सोने, चांदी, तांबे, पितळ भांड्यांना पॉलिश करतो असे म्हणत त्यांनी लता यांना घरातून तांब्याचे भांडे आणण्यास सांगितले. तांब्याचे भांडे पॉलिश केल्याचे पाहून ऋता जैन यांनी त्यांना चांदीचा तांब्या पॉलिश करण्यासाठीं आणून दिला. त्यानंतर त्या भामट्यांनी महिलेकडून गळ्यातील सोन्याची चैन, दोन बांगड्या व अंगठी देखील काढुन घेतले. त्यानंतर घरातून बंद झाकणाचा डबा आणायला सांगितला व त्यात दोन चमचे हळद, सर्व दागिने व लिक्विड टाकण्यास सांगितले.‌त्यानंतर हा डबा गॅस शेगडीवर ठेवायला सांगितला.आम्ही शेजारच्या घरी जाऊन येतो असे सांगून ते दोघेही निघून गेले.‌ थोड्या वेळाने डब्यात दागिने नसल्याने आढळुन आल्यानंतर आपली फसवणुक झाल्याचे जैन यांच्या लक्षात आले.‌ लता जैन यांनी तातडीने पोलिसांत जाऊन फिर्याद दिली. याप्रकरणी अनोळखी व्यक्तींविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.